आठ हजार जणांनी वापरला नोटा
By admin | Published: May 19, 2014 03:09 AM2014-05-19T03:09:44+5:302014-05-19T03:09:44+5:30
लोकसभा निवडणुकांपूर्वी सोशल नेटवर्क साईट्सहून नोटाचा भरपूर प्रचार आणि प्रसार झाला होता. शिवाय सामाजिक सेवाभावी संस्थांनी नोटाविषयी जनजागृती केली होती.
मुंबई : लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या नकारार्थी मतदानाचाही फटका उमेदवारांना बसला असून, मुंबई शहर आणि उपनगरातील सहाही लोकसभा मतदारसंघांत प्रत्येकी सरासरी ८ हजार मतदारांनी नोटाचा वापर केला आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी सोशल नेटवर्क साईट्सहून नोटाचा भरपूर प्रचार आणि प्रसार झाला होता. शिवाय सामाजिक सेवाभावी संस्थांनी नोटाविषयी जनजागृती केली होती. मुलुंड आणि कांजूर येथील डम्पिंग ग्राउंडचा त्रास होणारे रहिवासी असोत, वांद्रे येथील शासकीय वसाहत असो नाहीतर ग्रँटरोड येथील नव्या चिखलवाडीतील रहिवासी असो; या सर्वांनीच आपापले प्रश्न मांडून आपण मतदानादरम्यान नोटाचा वापर करणार असल्याचा इशारा दिला होता. मुंबई शहर आणि उपनगरातील सहाही लोकसभा मतदारसंघांचा विचार करता येथे प्रत्येकी सरासरी ८ हजार मतदारांनी नोटाचा वापर केला आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात आपचे उमेदवार मयांक गांधी यांना ५१,८६० एवढी मते मिळाली. मनसेचे उमेदवार महेश मांजरेकर यांना ६६,०८८ मते मिळाली. तर या मतदारसंघात ११,००९ मतदारांनी नोटाचा वापर केला. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण ९,५६३ मतदारांनी नोटाचा वापर केला. मलबार हिल विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे २,२६० मतदारांनी नोटाचा वापर केला. वरळीतून १,६१२, शिवडीतून १,७०५, भायखळ्यातून १,४४६, मुंबादेवीतून १,०२१, तर कुलाबा मतदारसंघातून १,४९१ मतदारांनी नोटाला पसंती दिली. मुंबई शहर आणि उपनगरातील सहाही मतदारसंघांचा विचार करता उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ११,००९ एवढ्या मतदारांनी नोटाला पसंती दिली. तर उत्तर पूर्व मुंबईत सर्वांत कमी म्हणजे ७,११४ मतदारांनी नोटाला पसंती दिली. (प्रतिनिधी)