आरोग्य विभागाकडून केवळ नोटिसांचा फार्स
By admin | Published: July 15, 2016 09:24 PM2016-07-15T21:24:24+5:302016-07-15T21:24:24+5:30
बीड जिल्हा रूग्णालयात साडेतीन महिन्यांपूर्वी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दुर्लक्षामुळे व डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पाच पैकी चार रूग्णांची दृष्टी आधू झाली होती.
- व्यंकटेश वैष्णव
बीड, दि. १५ - बीड जिल्हा रूग्णालयात साडेतीन महिन्यांपूर्वी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दुर्लक्षामुळे व डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पाच पैकी चार रूग्णांची दृष्टी आधू झाली होती. या प्रकरणात उशिराने जागे झालेल्या राज्य आरोग्य विभागाने केवळ डॉक्टरांना कारणे द्या नोटीस शुक्रवारी दिल्या आहेत. केवळ नोटिसांचा फार्स केल्याने कायमचे अंधत्व आलेल्या त्या रूग्णांची शासनाकडून अवहेलनाच होत आहे.
नेत्रशस्त्रक्रिया शिबिरादरम्यान डॉक्टरांनी केलेल्या हलगर्जीपणावर चौकशी समितीनेही शिक्कामोर्तब केले होते. आॅपरेशन केलेल्या रूग्णांचे डोळे परत येणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी पाचही रूग्णांना मुंबई येथील जेजे हॉस्पिटलला हालविले. उद्भवलेली परिस्थिती गंभीर आहे. यामध्ये राज्याच्या आरोग्य विभागाची आब्रू चव्हाट्यावर येईल. म्हणून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न तेव्हा झाला होता. याबाबत ह्यलोकमतह्ण ने हे प्रकरण उजेडात आणले होते. मात्र या प्रकरणात दोषी असलेल्या डॉक्टरांवर कारवाई झाली नव्हती.
याप्रकरणी विश्वासनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनांमध्ये नांदेड येथील आ. अमर राजूरकर यांनी तारांकीत प्रश्न दाखल करताच साडेतीन महिन्यात कुठलीच कारवाई न केलेले राज्य आरोग्य विभाग जागे झाले. शुक्रवारी बीड येथील नेत्र विभागातील डॉ. आर. आर. निरगुडे यांना याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, वरिष्ठांकडून सदरील विषयाबाबत माहिती मागविली आहे.
कायमचे अंधत्व आलेल्यांचे काय?
जिल्हा रूग्णालय प्रशासन व संबंधित डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे अंधत्व आलेल्यांमध्ये धडधाकट महिला- पुरुषांचा समावेश आहे. त्यांच्यावर कुटुंबाची जबाबादारी आहे. त्यांना अद्याप शासनाने मदतीच्या रुपात फुटकी कवडीही दिली नाही. दृष्टी मागायला आले अन् आहे ती दृष्टी गमावून बसले, असा दुर्दैवी प्रसंग ओढावल्याने त्यांचे भवितव्य अंध:कारमय झाले आहे. त्यांची दृष्टी परत आणून देणार का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांनी उपस्थित केला आहे.
यांना आले आहे कायमचे अंधत्व
२१ एप्रिल २०१६ रोजी बीडच्या जिल्हा रूग्णालयात डोळ्याच्या शस्त्रक्रीये दरम्यान सुभद्रा भोसले (रा. माजलगाव), मालनबाई जगदाडे (रा. केज), भागूबाई विघ्ने (रा. माजलगाव), विठ्ठल कोल्हे (रा. डोंगरकिन्ही), भानूदास विघ्ने (रा. माजलगाव) असे दृष्टी अधू झालेल्या रूग्णांची नावे आहेत.