अवैध बांधकामांना नोटिसा
By admin | Published: October 17, 2016 03:36 AM2016-10-17T03:36:09+5:302016-10-17T03:36:09+5:30
दोन वेळा दुर्घटना झाल्याने शहरातील ओव्हरफ्लो झालेले राणा डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात आले आहे.
उल्हासनगर : दोन वेळा दुर्घटना झाल्याने शहरातील ओव्हरफ्लो झालेले राणा डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात आले आहे. तसेच त्याची पर्यायी व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. याच डम्पिंगशेजारील खुल्या भूखंडावर झोपडपट्टी तसेच व्यापारी गाळे अवैधरीत्या बांधले आहेत. हे डम्पिंग पुन्हा सुरू करण्यासाठी मनपा आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी या सर्व बेकायदा बांधकामांना नोटिसा बजावल्या.
राणा डम्पिंगशेजारील खुल्या भूखंडावर झोपडपट्टी व लांब व्यापारी गाळे उभे राहिले आहे. विनापरवाना व खुल्या भूखंडावर उभ्या राहिलेल्या व्यापारी गाळ्यांना पालिकेचा मालमत्ताकर लागू झालेला नाही. ज्यांना झाला, तो नाममात्र असून बनावट कागदपत्रे सादर करून मालमत्ताकर व्यापारी गाळ्यांना लावला आहे. नोटीस मिळाल्यानंतर एका महिन्यात मालमत्तेची कागदपत्रे प्रभाग अधिकाऱ्यांकडे सादर करायची आहेत. या प्रकाराने भूमाफियांसह पालिका अधिकारी आणि राजकीय नेत्यांचेही धाबे दणाणले आहेत.
>दुर्घटनेमुळे कचरा टाकण्यास स्थगिती
उल्हासनगरातील कचरा म्हारळ गावाजवळील राणा डम्पिंग ग्राउंडवर १५ वर्षांपासून टाकला जात आहे. कचरा ओव्हरफलो होऊन दोन वेळा दुर्घटना झाल्याने स्थानिकांनी कचरा टाकण्यास मनाई केली.
अखेर, राणा डम्पिंग तात्पुरते बंद करण्याचा निर्णय पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना घ्यावा लागला. पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत कॅम्प नं-५ येथील खडी खदाण येथे कचरा टाकण्यात येत आहे. तेव्हापासून शहरातील ओला-सुका कचरा कॅम्प नं-५ येथील नव्या खडी खदाणीवर टाकला जात आहे.
>पर्यायी जागेचा शोध
राणा डम्पिंगशेजारील झोपडपट्टीमध्ये आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला असून प्रत्येक घरात एक जण आजारी असल्याचे उघड झाले आहे. पालिकेने यासाठी २४ बाय ७ दवाखान्याला मान्यता दिली आहे. मात्र, पालिका दवाखाना सुरू होण्यापूर्वी डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून पर्यायी जागेचा शोधही सुरू आहे. सध्या डम्पिंग जागेसाठी आलेल्या प्रस्तावावर पालिका निर्णय घ्ोणार आहे. पावसाळ्यात डम्पिंगवरील दुर्गंधयुक्त पाणी झोपडपट्टीत घुसत असल्याने आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. तसेच डम्पिंगच्या सपाटीकरणावर वर्षाला दीड कोटीचा खर्च केला जात आहे. मात्र, समस्या जैसे थे आहे.