कर्ज फेडण्यासाठी छापल्या नोटा
By admin | Published: April 9, 2017 03:42 AM2017-04-09T03:42:41+5:302017-04-09T03:42:41+5:30
कर्ज फेडून झटपट श्रीमंत होण्यासाठी घरातच बनावट नोटांचा छापखाना सुरू करणाऱ्या त्रिकुटाचे बिंग फोडण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने ही कारवाई केली
मुंबई : कर्ज फेडून झटपट श्रीमंत होण्यासाठी घरातच बनावट नोटांचा छापखाना सुरू करणाऱ्या त्रिकुटाचे बिंग फोडण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने ही कारवाई केली आहे. अटक त्रिकुटाकडून २ हजार किमतीच्या ७० लाख ८ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. मुख्य सूत्रधार जतीन सोलंकी (३७), सचिन बन्सी (२५), विजय कांबळे (३९) या तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
नालासोपारा येथील रहिवासी असलेला सोलंकीवर ८ ते ९ लाखांचे कर्ज होते. ते फेडण्यासाठी सारे मार्ग बंद झाल्याने, त्याने नव्या चलनातील २ हजार दराच्या बनावट नोटा छापण्याचे ठरविले. यासाठी त्याने डीटीपी आॅपरेटर असलेल्या मित्र सचिन बन्सीची मदत घेतली. स्कॅनर, झेरॉक्स मशिन, लॅपटॉपच्या खरेदीची जबाबदारी कांबळेवर सोपविली. तिघांनीही झटपट लखपती होण्याचे स्वप्न रंगविले. नालासोपारा येथील घरातच सोलंकीने बनावट नोटांची छपाई सुरू केली. सुरुवातीला त्यांनी नव्या चलनातील २ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली.
बाजारात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ला मिळाली. गुन्हे शाखा कक्ष ९ चे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक महेश देसाई, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पाडवी, आशा कोरके, सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, किशोर पाटील, शरद धराडे, पोलीस उपनिरीक्षक बनसोडे यांच्यासह पोलीस अंमलदार पथकाने तपास सुरू केला. गेल्या आठवडाभर तपास पथक या त्रिकुटावर लक्ष ठेवून होते.
शनिवारी हे तिघे वांद्रे किल्ला येथे पैशांच्या व्यवहारासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार, सापळा रचून तपास पथकाने या त्रिकुटाला अटक केली. त्यांच्या झडतीतून २ हजार रुपये किमतीच्या तब्बल ७० लाख ८ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या नोटा ही मंडळी ५० टक्के कमिशनवर देणार होती. गावाकडील भागात या नोटा चलनात आणण्यात येणार होत्या, तसेच हवाला मार्गेही या नोटा व्यवहारात आणण्याचा या त्रिकुटाचा प्रयत्न होता.
त्यापूर्वीच गुन्हे शाखेने त्याचा पर्दाफाश केला. त्यांच्या नालासोपारा येथील घरातही पोलिसांनी छापा टाकून स्कॅनर, झेरॉक्स मशिन, बनावट नोटांसाठी लागणारी साधने हस्तगत केली आहेत. तिघांचीही रवानगी कोठडीत करण्यात आली आहे.
त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात येत असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)
५०० च्या नोटांचीही छपाई
दोन हजार दराच्या नव्या नोटांचा प्रयत्न यशस्वी होताच या त्रिकुटाने नव्या दराच्या पाचशे रुपये दराच्या नोटांच्या छपाईचे काम सुरु केले होते. मात्र त्यापूर्वीच गुन्हे शाखेने हा डाव उधळून लावला.
रिपाइंचा कार्यकर्ता
नालासोपारा येथील रहिवासी असलेला विजय कांबळे हा रिपाइं पक्षाचा कार्यकर्ता आहे. बेरोजगारीमुळे तोही या कटात सहभागी झाला होता.
अशी व्हायची छपाई...
दोन हजार दराची खरी नोट स्कॅन करुन त्यातील क्रमांकांमध्येही ही मंडळी फेरफार करत होती. यामध्ये बन्सीकडे याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर सोलंकी या नोटांची झेरॉक्स काढायचा. तिघेही कटरने कागदावरील या नोटा एकसारख्या आकारात कापत होते.