सोळा साखर कारखान्यांना नोटिसा
By Admin | Published: January 16, 2015 11:05 PM2015-01-16T23:05:24+5:302015-01-16T23:40:16+5:30
साखर सहसंचालकांची कारवाई : ‘एफआरपी’नुसार १४ दिवसात दर देण्याची सूचना
सांगली : जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना उसाचा दर दिला नाही. याप्रकरणी जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांना कोल्हापूर येथील साखर सहसंचालक योगिराज सुर्वे यांनी कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. तसेच ऊस उत्पादकांना गळितासाठी ऊस नेल्यापासून चौदा दिवसात पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे.शुगर केन कंट्रोल १९६६ कायद्यानुसार चौदा दिवसांच्या आत शेतकऱ्यांना ‘एफआरपी’प्रमाणे दर दिला पाहिजे. परंतु, जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने ‘एफआरपी’नुसार दर दिला नाही. साखरेचे दर कमी झाल्यामुळे ‘एफआरपी’प्रमाणे दर देता येत नसल्याचे सांगितले आहे. तसेच साखर कारखानदारांनी एकत्रित बैठक घेऊन प्रति टन १९०० रूपयेप्रमाणे दर जाहीर केला. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेही जमा केले आहेत. काही कारखान्यांनी तर प्रति टन चौदाशे ते पंधराशे रूपयेप्रमाणे दर शेतकऱ्यांना दिला आहे. या दराप्रमाणेही कारखानदारांनी शेतकऱ्यांना वेळेत बिले दिली नाहीत. यासह अनेक तक्रारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य शेतकरी संघटनांनी साखर आयुक्त आणि साखर सहसंचालकांकडे केल्या होत्या. याची गंभीर दखल घेऊन कोल्हापूर साखर सहसंचालक योगिराज सुर्वे यांनी शुक्रवारी सांगली जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांना, ‘एफआरपी’प्रमाणे दर न दिल्याबद्दल नोटीस बजाविली आहे. कायद्यानुसार ‘एफआरपी’प्रमाणे दर देणे बंधनकारक असतानाही तुम्ही शेतकऱ्यांना दर का दिला नाही? या सर्व प्रश्नांवर कारखानदारांकडून त्यांनी खुलासा मागविला आहे. आठ दिवसात त्यांनी उत्तर दिल्यानंतर त्यांच्यावर साखर आयुक्तांकडून पुढील कारवाई होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी, साखर उद्योग अडचणीत असल्यामुळे शासनाने मदत केली पाहिजे, तरच ‘एफआरपी’प्रमाणे दर देणे शक्य असल्याचे म्हटले आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील कारखान्यांची उताऱ्यानुसार एफआरपी
साखर कारखानाएफआरपी दर
हुतात्मा (वाळवा)२६३९.२६
विश्वास (चिखली)२५७६.०१
सर्वोदय (कारंदवाडी)२५३७.६८
राजारामबापू (साखराळे)२४७०.३६
राजारामबापू (वाटेगाव)२४२१.०१
क्रांती (कुंडल)२४१०.२३
सोनहिरा (वांगी)२४०७.८९
उदगिरी शुगर (बामणी)२३२२.४९
साखर कारखानाएफआरपी दर
मोहनराव शिंदे (म्हैसाळ)२३०६.४४
महांकाली (क़महांकाळ)२२००
केन अॅग्रो (कडेगाव)२१२६.२८
माणगंगा (आटपाडी)२०७८.७९
वसंतदादा (सांगली)२०६९.७५
यशवंत शुगर (नागेवाडी)२००२.९३
डफळे (जत)१९११.३९
सदगुरु श्री श्री शुगर१७७२
शासनाने कारखान्यांवर कारवाई करावीच
‘एफआरपी’नुसार दर न देण्यास आम्ही काही शेतकऱ्यांचे शत्रू नाही. आम्हीही शेतकऱ्यांचीच पोरं असून शेतकऱ्यांना शेतीचा उत्पादन खर्च परवडत नाही, त्यांना योग्य दर मिळाला पाहिजे, अशीच आमची भूमिका आहे. परंतु, केंद्र आणि राज्य शासन साखर कारखानदारांची अडवणूक करीत असून शेतकऱ्यांना चांगला दर मिळू नये, अशीच त्यांची भूमिका आहे. यामुळे राज्य शासनाने आणि साखर सहसंचालकांनी जरूर कारखान्यांना नोटिसा बजावून कारवाई करावीच. त्यांच्या नोटिसांना योग्य उत्तर देऊ, असे मत क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरूण लाड यांनी व्यक्त केले.