नोटेवरील गांधी
By admin | Published: January 29, 2017 12:34 AM2017-01-29T00:34:48+5:302017-01-29T00:34:48+5:30
गांधीजींचे कोणते चित्र सर्वात लोभस वाटते, असा प्रश्न विचारला तर बहुतेकांचे उत्तर येईल नोटेवरील. मला प्रश्न पडला की, गांधींचे चित्र लोभस की नोट लोभस? क्षणभर वाटते
- डॉ. नीरज देव
गांधीजींचे कोणते चित्र सर्वात लोभस वाटते, असा प्रश्न विचारला तर बहुतेकांचे उत्तर येईल नोटेवरील. मला प्रश्न पडला की, गांधींचे चित्र लोभस की नोट लोभस? क्षणभर वाटते ‘स्थानम् प्रधानम्’. नोटेवर गांधी असोत की गोडसे; नोटेमुळे लोभसच वाटतील. पण प्रश्न दुसरेच आहेत, नोटेवर गांधींचे चित्र असावे का? आणि असलेच तर पाचावर अन् पाचशेवर गांधींचे एकच चित्र का? पाचावर तरुण गांधी व पाचशेवर वृद्ध गांधी का नकोत? तरुण गांधींपेक्षा वृद्ध गांधी अधिक परिपक्व असावेत म्हणून तर असे नसावे ना?
असे सांगतात की, लोकमान्य टिळकांना जेव्हा गांधी पहिल्यांदा भेटले तेव्हा खाडिलकरांनी विचारले, ‘कसा वाटतो हा पोरगा?’ तेव्हा टिळक म्हणाले, ‘बनिया आहे.’ तीच बाब रजनीशांनी वारंवार मांडली. बनिया म्हणजे वैश्यवृत्तीचा. वैश्यवृत्ती म्हणजे हिशोबीपणा. असे सांगतात की, एकदा गांधींच्या सभेनंतर लोकांनी पैसे अर्पण केले. मुक्कामाच्या स्थळी आल्यावर त्यांनी ते मोजायला सुरुवात केली, त्यात त्यांना एका बाईने टाकलेली कानातील एक कुडी मिळाली, दुसरी मिळेना. गांधीजी कार्यकर्त्यांना म्हणाले, ‘ती बाई केवळ एकाच कानातील कुडी टाकणार नाही. टाकली तर दोन्ही कानातील टाकील. दुसरी तिथेच पडलेली असेल.’ त्यांनी मध्यरात्री एकाला तिकडे पिटाळले. त्याने ती शोधून आणेपर्यंत गांधीजी जागेच होते. ती मोजून त्या राशीत टाकल्यानंतरच ते झोपले. या हिशोबीपणाला काय म्हणावे? महात्मा की बनिया?
महात्म्याला तर धनद्रव्य-सोने-चांदी सारे काही मृत्तिकेसमान असते. देहूच्या वाण्याबाबतचा अनुभव तोच अन् धनाला स्पर्शही न करणाऱ्या गदाधर-रामकृष्णासंबंधातील अनुभवही तसाच. तितक्यात मनात विचार आला, धन आती-जाती माया आहे ते खरे वाटावे म्हणून तर नोटेवर गांधीजी नसावेत ना? कारण सत्याचा गांधीजींनी घेतलेला सततचा ध्यास. पण सत्य गांधीजींना सापडले होते का? बहुधा नसावे, म्हणून तर प्रामाणिक गांधींनी त्यांच्या आत्मकथेला शीर्षक दिले ‘सत्याचा शोध’; सत्याचा अनुभव नव्हे. मला माझ्या प्रश्नाचे उत्तर गवसले. सत्याच्या शोधाची आस प्रत्येकालाच असते. प्रत्येक जण सत्यालाच शोधतो. कोणी ध्यानात, कोणी योगात, कोणी भोगात, कोणी शास्त्रांत, कोणी श्रद्धेत तर कोणी अंधश्रद्धेत. पण सत्य तर हे आहे की, ९९ प्रतिशतांचा विश्वास असतो की नोट सत्य आहे, किंबहुना नोटेच्या आधारे सत्याजवळ जाता येईल, सत्याचा शोध घेता येईल. अनुभवच तसा असतो. नोटेच्या प्रभावाने खोटी प्रमाणपत्रे खरी होतात, नसलेली प्रकट होतात. होत्याचे नव्हते होते व नव्हत्याचे होते होताना दिसते. अन्यायाला निर्दोषत्वाचा दाखला मिळतो, कायदा गाढव होतो आणि हो लोकांची मते खरीदता येतात, मनपरिवर्तनही काहीसे घडविता येते. कळत नकळत सत्य विसरता येते.
सत्याची गरज आपल्याला नसतेच, किंबहुना स्वत:च्या सुखाचा त्याग करून मिळणारे सत्य आपल्याला नको असते. आपल्या सत्याचा शोध हा सुखाच्या शोधामार्फतच जातो. त्यामुळेच उघडेनागडे सत्य आपल्याला ओंगळच वाटते. कदाचित ते जाणीव करून देते आपल्या नश्वरतेची, अपूर्णतेची. खरे सांगायचे तर सत्य अर्ध्याने कधीच भेटत नाही; भेटले तर पूर्णच भेटते. त्यामुळे ‘नरो वा कुंजरो वा’ उत्तर देणाऱ्या सत्यवान युधिष्ठिराचा रथ जमिनीला टेकला. सत्य हेच असते की सत्याच्या पक्षात कोणीच नसतो, पण प्रत्येक जण सत्याला आपल्या पक्षात खेचण्याचा प्रयत्न करतो. परिणामी आपलेच सत्य खरे असे प्रत्येकालाच वाटते. यालाच सत्याभास म्हणत असावे. गांधींचेही तसेच होते. ते कोणाच्याच पक्षात नव्हते, त्यांचा पक्ष ते स्वत:च होते. अन् हो नोटेचेही तसेच असते; आपलीच आपल्याला मोलाची वाटते.
आणखी एक गोष्ट; सारे काही खरेदी करता येते, पण सत्याची खरेदी करता येत नाही, नोटेची पण खरेदी करता येत नाही, ती कमवावीच लागते. सत्य नि नोटेत हेच साधर्म्य असते. सत्याचे प्रतीक म्हणून आपण गांधींना मानतो, त्यामुळेच त्यांचे चित्र नोटेवर छायांकित असावे? सत्याभास निर्माण करण्यासाठी!