शहिदांच्या कुटुंबीयांना आता मिळणार २५ लाख, मुख्यमंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 10:02 PM2018-01-31T22:02:38+5:302018-01-31T22:27:15+5:30
आपल्या राज्यात शहिदांच्या कुटुंबीयांना केवळ साडेआठ लाख रुपये दिले जातात. मात्र भविष्यात हा निधी २५ लाख रुपये इतका करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी वरळी येथील कार्यक्रमात केली.
मुंबई - आपल्या राज्यात शहिदांच्या कुटुंबीयांना केवळ साडेआठ लाख रुपये दिले जातात. मात्र भविष्यात हा निधी २५ लाख रुपये इतका करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी वरळी येथील कार्यक्रमात केली. अथर्व फाऊंडेशन आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. या कार्यक्रमात सैन्यातील जवानांचा आणि शहीद कुटुंबीयांचा सन्मान करण्यात येत आहे.
'वन फॉर ऑल, ऑल फॉर वन' ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे. फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील राणे यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच जवानांचा सन्मान करणारा कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून देशाच्या केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आसामचे राज्यपाल प्रा. जगदीश मुखी उपस्थित आहेत. या कार्यक्रमासाठी परमवीर चक्र विजेते कॅप्टन बाणा सिंग, योगेंद्र यादव, संजय कुमार यांचीही विशेष उपस्थिती होती.
बॉलिवूडमधील खिलाडी अक्षय कुमारने सुकुमा येथे नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी केलेल्या आर्थिक मदतीबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्याचे आभार मानले होते. राजनाथ सिंह यांनी अक्षय कुमारचं कौतुक करत मदत केल्याप्रकरणी आभार प्रकट केले आहेत. सुकुमा येथे 11 मार्च रोजी माओवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 12 जवान शहीद झाले होते. या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना अक्षय कुमारने 9 लाखांची मदत दिली आहे.