आता पंकजा मुंडेच्या सहमतीने २०६ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

By admin | Published: June 24, 2015 03:23 PM2015-06-24T15:23:01+5:302015-06-24T18:27:28+5:30

विनोद तावडेंच्या बोगस डिग्रीच्या आरोपांमागोमाग आता पंकजा मुंडे यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्याचा आरोप होत आहे.

Now, allegations of corruption of Pankaja Munde have amounted to Rs 206 crores | आता पंकजा मुंडेच्या सहमतीने २०६ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

आता पंकजा मुंडेच्या सहमतीने २०६ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

Next
>ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. २४ - भ्रष्टाचारमुक्त राज्यकारभाराचे आश्वासन देणा-या भारतीय जनता पार्टीच्या पक्षावर राज्यामध्ये भ्रष्टाचाराच्या दुस-या आरोपाने नामुष्की आली आहे. लोकमतने २ जून रोजी म्हणजे तब्बल २० दिवसांपूर्वी उघड केलेल्या या घोटाळ्याला आता पाय फुटले असून सगळ्या प्रसारमाध्यमांनी पंकजा मुंडेविरोधी राग आळवायला सुरूवात केली आहे. विनोद तावडेंच्या बोगस डिग्रीच्या आरोपांमागोमाग आता पंकजा मुंडे यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्याचा आरोप होत आहे. मुंडे यांनी केवळ एका दिवसात २४ अध्यादेश काढले आणि अनेक नियम धाब्यावर बसवत कोट्यवधी रुपयांच्या सामानाची खरेदी केल्याचा आरोप आहे. एकूण भ्रष्टाचाराचा आकडा २०६ कोटी रुपयांचा असल्याचा दावा केला जात आहे.
मुंडे या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री असून पुस्तके, प्रिंटिंग मटेरियल अशा प्रकारची खरेदी १३ फेब्रुवारी रोजी अवघ्या एका दिवसात २४ अध्यादेश काढून केल्याची माहिती आहे. या माध्यमातून तब्बल २०६ कोटी रुपयांची खरेदी एकाच दिवसात करण्याइतकी काय घाई होती असा प्रश्न विचारला जात आहे. एवढेच नाही तर तीन लाख रुपयांच्या पेक्षा जास्त रकमेची खरेदी ई-टेंडरच्या माध्यमातून करणे अपेक्षित असताना सदर खरेदी करताना मात्र सव्वा कोटी, चार कोटी, साडेपाच कोटी रुपयांची कंत्राटे निविदा न काढता केल्याचा आरोप केला जात आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सकृतदर्शनी हा सरळ सरळ मोठा घोटाळा दिसत असल्याचे सांगत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली आहे. अर्थात, आधी मुंडे यांची बाजू ऐकायला हवी, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे ऐकायला हवे असे चव्हाण म्हणाले.
विशेष म्हणजे मुंडे यांच्यावर केल्या जात असलेल्या आरोपांमध्ये त्यांच्या खात्याने खरेदी केलेली न्याहारीतील चिक्की ही अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचा समावेश आहे. ज्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले होते, त्यालाच काम देण्यात आल्याचा दावाही एका इंग्रजी वृत्तवाहिनीने केला आहे. अहमदनगरमध्ये आदिवासी मुलांना देण्यात येणा-या चिक्कीच्या बाबतीत ही बाब निदर्शनास आधी आली आणि त्यानंतर एकूण प्रकार समोर आल्याचे दिसत आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या नेत्यांनी आधी पंकजा मुंडे यांचे म्हणणे आधी ऐकायला हवे असे सांगताना मीडिया ट्रायल होऊ नये अशी भूमिका घेतली आहे. पंकजा मुंडे सध्या उपलब्ध नसून त्या आल्यावर प्रतिक्रिया देतील असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. पंकजा मुंडे या विदेशात गेल्या असून त्या २ जुलै रोजी येतील असे त्यांच्यावतीने सांगण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, केवळ पंकजा मुंडेच नाही तर येत्या काळात सरकारमधील आणखी काही मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येतील असे सूचक विधान काँग्रेसचे नेते अनंत गाडगिळ यांनी केले आहे.
दरम्यान, कुठल्याही नियमांचा आपण भंग केला नसल्याचा खुलासा पंकजा मुंडे यांनी केला आहे. ई-टेंडरिंगचा तर प्रश्नच येत नाही कारण त्या संबंधीचे नियम मागाहून करण्यात आले असा दावाही मुंडे यांनी केला आहे.

Web Title: Now, allegations of corruption of Pankaja Munde have amounted to Rs 206 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.