आता ‘एम-इंडिकेटर’वरही नोंदवा तुमची प्रतिक्रिया
By Admin | Published: April 10, 2015 04:54 AM2015-04-10T04:54:30+5:302015-04-10T04:54:30+5:30
नव्याने ताफ्यात आलेल्या बम्बार्डियर लोकलबाबत प्रवाशांच्या प्रतिक्रिया मिळविण्यासाठी एमआरव्हीसीचा (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) आटापिटा
मुंबई : नव्याने ताफ्यात आलेल्या बम्बार्डियर लोकलबाबत प्रवाशांच्या प्रतिक्रिया मिळविण्यासाठी एमआरव्हीसीचा (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) आटापिटा सुरू असून, त्यासाठी आता एम-इंडिकेटरचीही मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या इंडिकेटरवर १0 एप्रिलपासून प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेतल्या जाणार आहेत.
एमआरव्हीसीमार्फत एमयूटीपी-२ अंतर्गत ७0 नव्या बम्बार्डियर लोकल टप्प्याटप्प्यात येणार आहेत. याआधी दोन लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात आल्या असून, प्रवाशांच्या सेवेतही १५ मार्चपासून त्या दाखल झाल्या आहेत. चर्चगेट ते अंधेरी, बोरीवली, विरारपर्यंत या लोकल धावत आहेत. सध्या ताफ्यात आलेल्या नव्या लोकल प्रवाशांसाठी कितपत फायदेशीर ठरत आहेत हे बघण्यासाठी एमआरव्हीसीने प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी १० प्रश्नांचा एक फॉर्म तयार करून तो एमआरव्हीसीने आपल्या वेबसाईटवर टाकला. मात्र त्याला अल्प प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रत्यक्षात बम्बार्डियर लोकलमध्ये जाऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेण्याचाही निर्णय घेतला आणि त्यासाठी चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली.
‘एम-इंडिकेटर’ या अॅपवरही प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेण्याचा निर्णय झाला आहे. १0 एप्रिलपासून (शुक्रवार) या इंडिकेटरवरही प्रतिक्रियांसाठी प्रश्नांचा फॉर्म उपलब्ध होणार आहे. तर शनिवारपासून सकाळी १0 ते दुपारी २ आणि संध्याकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत तो उपलब्ध होईल, असे एम-इंडिकेटरचे संस्थापक सचिन टेके यांनी सांगितले. (प्रतिनिधी)