लग्नसराईच्या १७ मुहूर्तांवर आता सराफांचे लक्ष
By admin | Published: April 6, 2017 03:26 AM2017-04-06T03:26:09+5:302017-04-06T03:26:09+5:30
सोन्याच्या देशभरातील आयातीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ३०० टनांची घट झाली आहे
अनिकेत घमंडी,
डोंबिवली- सोन्याच्या देशभरातील आयातीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ३०० टनांची घट झाली आहे, अशी माहिती ‘आॅल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन असोसिएशन’चे विभागीय संचालक नितीन कदम यांनी ‘लोकमत’ला दिली.
मागील वर्षी पाडव्यादरम्यान एक हजार १०० टन सोन्याची आयात झाली होती. यंदा मात्र तुलनेने २५०-३०० टनांची घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. यंदाच्या वर्षी एप्रिल-मेमध्ये लग्नसराईचे १७ मुहूर्त असून त्याकडे सराफ व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. त्यातील खरेदीवरच त्यांची भिस्त आहे.
असे असले तरीही बाजारात अद्यापही मंदीच आहे. पाडव्यानिमित्ताने सोनेचांदीखरेदीत वाढ होईल, असे वाटले होते, पण तसे झालेले नसल्याचे कदम म्हणाले.
सोन्याच्या प्रतितोळा दरामध्येही घट झाली आहे. सध्याचा २८ हजार ५०० रुपयांचा दर सन २०१४ मध्येही होता. त्यामुळे त्यात वाढ झालेली नाही. मध्यंतरीच्या काळात सोने ३३ हजारांपर्यंत गेले होते, पण आता एवढ्यात तरी उसळी मारणार नसल्याचे स्पष्ट चित्र असल्याचे ते म्हणाले. नोटाबंदीमुळे हा फटका बसला असून त्याचे परिणाम देशभरातील सराफ बाजारात दिसून येत आहेत.
लग्नाचे एप्रिलमध्ये चार, मे महिन्यात १३ मुहूर्त आहेत. त्या पार्श्वभूमीवर ग्राहकांकडून सोनेखरेदी होण्याची अपेक्षा आहे. पण, ग्राहकांमध्ये हवी तेवढी क्रयशक्ती दिसून येत नाही. मागणी तसा पुरवठा, या सिद्धान्तानुसार पाडवा, रामनवमी या महत्त्वाच्या सणउत्सवांना मागणी वधारलेली नाही. त्यामुळे १७ मुहूर्तांकडेच ठाणे-मुंबईमधील सुमारे तीन हजारांहून अधिक सराफ व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. मात्र, असे असले तरीही फारसा फरक पडेल, असे दिसत नाही.
>अन्यथा पाच महिने थांबा
सोनेचांदीचे अलंकार हे स्त्रीधन असते. त्यामुळे लग्नसराईनिमित्ताने जी खरेदी होईल तेवढीच. त्यानंतर, पाच महिने दसरादिवाळीपर्यंत वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे सराफ व्यावसायिकांमध्ये फारसा उत्साह नसल्याचे कदम म्हणाले.
कारागिरांमध्येही निराशा
सराफ बाजारात निराशा असून घडणावळीवर सूट यासह अन्य कोणत्याही योजना कशा राबवायच्या, हा पेच व्यावसायिकांसमोर आहे. त्याचा परिणाम कारागिरांवर होत असल्याने कुशल कारागिरांमध्येही नैराश्य आहे.