आता येतील बेइमानांना बुरे दिन

By admin | Published: December 25, 2016 05:16 AM2016-12-25T05:16:43+5:302016-12-25T05:16:43+5:30

नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतर इमानदार लोकांचा त्रास कमी होणार असून, आता बेइमानांचे बुरे दिन सुरू झाले आहेत. बेइमानांनो! वेळीच ताळ्यावर या, अन्यथा तुमची खैर नाही.

Now the bad guys will come bad days | आता येतील बेइमानांना बुरे दिन

आता येतील बेइमानांना बुरे दिन

Next

- यदु जोशी, मुंबई

नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतर इमानदार लोकांचा त्रास कमी होणार असून, आता बेइमानांचे बुरे दिन सुरू झाले आहेत. बेइमानांनो! वेळीच ताळ्यावर या, अन्यथा तुमची खैर नाही. सव्वाशे कोटी जनतेच्या ताकदीसमोर भ्रष्टाचाऱ्यांना झुकावेच लागेल, असा खणखणीत इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील भव्य स्मारकाचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते प्रत्यक्ष स्मारकस्थळी झाले. त्यानंतर मुंबईसह राज्यातील १ लाख ६ हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या भूमिपूजनाचे औचित्य साधून वांद्र्याच्या मैदानावर राज्य सरकारतर्फे भव्य सभा झाली. राज्यपाल सी. विद्यासागर राव अध्यक्षस्थानी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वेंकय्या नायडू, सुरेश प्रभू, पीयूष गोयल, रामदास आठवले, खा. उदयनराजे भोसले, खा. संभाजीराजे भोसले असे अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांच्या, ‘मोदी, मोदी’च्या घोषणांमध्ये पंतप्रधानांनी नोटाबंदीचा विषय छेडला. आता बेइमानांच्या बरबादीचा प्रारंभ झाला आहे. या बेइमानांना मोदींची, सरकारची भीती वाटत नसेल; पण त्यांनी १२५ कोटी प्रामाणिक जनतेचा दबाव कमी उल्लेखता कामा नये. त्याला घाबरावेच लागेल. जनता आता भ्रष्टाचार स्वीकारायला तयार नाही. भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई आम्ही जिंकत नाही तोवर ती थांबणार नाही, असे शिवस्मारकाच्या साक्षीने आपण सांगत असल्याचे मोदी यांनी सुनावले.
हे राज्य कायद्याचे आहे. मलाई खाणाऱ्यांचे राज्य संपले आहे. तुमच्यासमोर देश हारणार नाही. बँकेत पैसा टाकला अन् तो पांढरा झाला असे तुम्ही समजत असाल. बँकवाल्यांना पटवून तुम्ही सुटलात, असे वाटत असेल. पण तुमची आता गय नाही. तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा देत काळा पैसेवाल्यांविरुद्धची लढाई तीव्र करण्याचे स्पष्ट संकेत मोदींनी दिले. ७० वर्षे मलाई खाल्लेले लोक माझ्या नोटाबंदीच्या निर्णयाने अस्वस्थ झाले. त्यांनी जनतेला गोंधळवण्याचा प्रयत्न केला. पण जनता आपल्या निर्णयासोबत राहिली आणि आजही आहे, असे ते म्हणाले, तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.
सरकारचा एखादा निर्णय योग्य होता की अयोग्य हे निवडणुकीच्या कौलावरून सिद्ध होते. महाराष्ट्रातील जनतेने नगरपालिका निवडणुकीत भाजपाला प्रचंड यश देऊन नोटाबंदीच्या निर्णयावर पसंतीची मोहोर उमटविली असल्याचे सिद्ध झाले, असा दावा मोदी यांनी केला.
व्यासपीठावर भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, मंत्री सुभाष देसाई, विनोद तावडे, डॉ. दीपक सावंत, प्रकाश मेहता, राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, प्रवीण पोटे-पाटील, महापौर स्नेहल आंबेकर, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आदी उपस्थित होते. शेजारच्या छोट्या व्यासपीठावर सर्व मंत्री, खासदार तर डाव्या बाजूला राज्यातील राजघराण्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ते शाही वेषात होते.

भाजपा-सेनेचे इथेही घोषणायुद्ध
शिवस्मारकाच्या निमित्ताने शिवसेनेवर भाजपा कुरघोडी करीत असताना या कार्यक्रमात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने येतील, अशी चर्चा होती. झालेही तसेच. मोदी सभास्थानी येताच ‘मोदी, मोदी’चा जल्लोष भाजपा कार्यकर्त्यांनी सुरू केला. त्यावर ‘आवाज कुणाचा... शिवसेनेचा’, ‘शिवसेनेचा वाघ आला’ अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी सुरू केली. त्यामुळे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील प्रास्ताविक करीत असताना त्यांना थांबवत मुख्यमंत्र्यांना माइकचा ताबा घ्यावा लागला.

‘जे छत्रपतींचे मावळे असतील ते जागेवर बसतील,’ असे आवाहन करीत त्यांनी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशी जोरदार घोषणा दिली. खास शिवसेनेची ओळखली जाणारी, ‘जय जय जय जय जय भवानी, जय जय जय जय जय शिवाजी’ ही घोषणा अत्यंत त्वेषाने देऊन त्यांनी सभेत जोशही भरला आणि कार्यकर्त्यांना शांतही केले.

उद्धव ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात होताच, ‘मोदी, मोदी’चा रेटा पुन्हा सुरू झाला. पुन्हा शिवसैनिकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ने जोरदार प्रत्युत्तर दिले.

महाराजांना मानाचा मुजरा
‘मी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो,’ अशी मराठीतून सुरुवात करून मोदी म्हणाले, देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा असा हा क्षण आहे. त्यांच्या कार्यकाळात विदेशातून नाणी तयार करून देण्याचा प्रस्ताव त्यांनी फेटाळला आणि स्वत: मुद्रानिर्मिती केली. दुसऱ्याच्या चलनावर आपली अर्थव्यवस्था उभारणे त्यांना मान्य नव्हते. शिवाजी महाराजांचे अढळ स्थान त्यांनी केवळ लढाया जिंकल्या यात नाही, तर
ते संघटनकौशल्य, मावळ्यांना ताकद, आरमार, जलव्यवस्थापन अशा अनेक बाबींचे शिल्पकार होते. संघर्षशील आयुष्यात त्यांनी सुशासन व उत्तम प्रशासनाचा नवा अध्यायच लिहिला.

पुणे मेट्रोचे भूमिपूजन
बेनामी संपत्तीला आळा घालणारा कायदा संसदेने मंजूर करूनही मागील सरकारने तो अडवून ठेवला. त्यामुळे बेनामी संपत्तीचे पाप वाढत गेले. हे पाप रोखण्यासाठीच कठोर पावले उचलली आहेत. गेल्या ४० वर्षांत देशातील रोगांवर वेळीच इलाज झाला असता तर १२५ कोटी जनतेला आज रांगेत उभे राहावे लागले नसते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदर्श शिवशाही अपेक्षित होती. आज मोदी तीच देशात आणत असल्याचा मला अभिमान आहे. भय, भूक व भ्रष्टाचार यापासून देश नक्कीच मुक्त होईल.
- नितीन गडकरी,
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री

शिवरायांचे नाव घेताच मुडदाच
काय पण दगडही उठून उभा राहील. तमाम मराठी माणसांच्या या दैवताचे स्मारक जगाला प्रेरणादायी ठरेल. महाराष्ट्रातील गड-किल्ले केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या वेढ्यातून मुक्त करा.
- उद्धव ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख

आम्ही कोणीही शिवा (छत्रपती शिवाजी महाराज) होऊ शकत नाही. पण हे आई तुळजाभवानी, आम्हाला जिवा (जिवा महाला) होण्याची शक्ती दे! छत्रपतींच्या आशीर्वादाने सत्ता मिळाली. ती सामान्यांसाठीच राबविणार.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

देशाला सदैव योगदान देण्याचेच काम करणाऱ्या मुंबईला विकासयोजनांची भेट आज नाताळच्या निमित्ताने दिली जात आहे. त्यात पंतप्रधान मोदी यांच्या पाठिंब्याने रेल्वे विभागाचा मोठा वाटा असल्याचा अभिमान वाटतो.
- सुरेश प्रभू, रेल्वे मंत्री

Web Title: Now the bad guys will come bad days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.