कुपोषण रोखण्यासाठी आता कीर्तनकारांचा आधार

By admin | Published: January 13, 2017 05:41 PM2017-01-13T17:41:11+5:302017-01-13T17:41:11+5:30

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 20 कीर्तनकार प्रबोधनाच्या माध्यमातून आरोग्याबाबत जनजागृती करणार आहेत. आरोग्य विभागाकडून हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे.

Now the basis of keertankaran to prevent malnutrition | कुपोषण रोखण्यासाठी आता कीर्तनकारांचा आधार

कुपोषण रोखण्यासाठी आता कीर्तनकारांचा आधार

Next

ऑनलाइन लोकमत/ रमाकांत पाटील

नंदुरबार, दि. 13 - समाज मनावर घट्ट चिकटून बसलेल्या अंधश्रद्धा आणि वाईट रुढीपरंपरांचा मैला स्वच्छ करण्यासाठी आता आरोग्य विभागाने कीर्तनकारांच्या प्रबोधनाचा पर्याय योजिला आहे. राज्यातील माता व बालमृत्यू रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात 20 कीर्तनकारांची निवड करण्यात आली असून हे कीर्तनकार महाराष्ट्रात आरोग्याचा जागर करणार आहेत.
पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची ख्याती असली तरी राज्यात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा व वाईट रुढीपरंपरांचा पगडा समाजमनावर आहे.
 
एकीकडे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असताना अंधविश्वासामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. विशेषत: अनेक क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असला तरी माता मृत्यूदर आणि बालमृत्यूदर मात्र इतर राज्याच्या तुलनेत समाधानकारक नाही. हे प्रमाण कमी करण्यासाठी आजवर अनेक प्रयोग राबवले असले तरी त्याचे अपेक्षित परिणाम दिसून न आल्याने आता आरोग्य विभाग आणि युनिसेफने कीर्तनकारांचा पर्याय योजिला आहे.
 
प्रत्येक कुटुंबात त्या त्या कुटुंबातील वडीलधारी मंडळीचे लोक ऐकत असतात. त्यामुळे वडीलधारी मंडळी जागृत झाल्यास त्याचा कुटुंबावरही परिणाम होतो. ही मंडळी कीर्तनाचे रसग्रहण अधिक प्रमाणात करते. त्यातून त्यांच्या मनावर विचारही प्रभावीपणे रुजतात. हीच बाब लक्षात घेऊन हा पर्याय शासनाने निवडला आहे.त्यासाठी अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाशजी बोदले महाराज यांच्या सहयोगातून प्रत्येक जिल्ह्यासाठी त्या त्या भागातील 20 प्रभावी कीर्तनकारांची निवड करण्यात आली आहे. या कीर्तनकारांना राज्यातील महसूल विभागनिहाय प्रशिक्षण देण्यात येत आहे. 
 
पहिल्या टप्प्यात औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती विभागाचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. या कीर्तनकारांसाठी युनिसेफ व आरोग्य विभागाने स्वतंत्र पुस्तिका तयार केली आहे. त्यात त्या त्या भागात समाजमनावर कोणत्या अंधश्रद्धा व रुढीपरंपरा आरोग्याला बाधक आहेत त्याची यादी तसेच सुदृढ आरोग्यासाठी पुराणात कुठले संदर्भ आहेत. त्याची माहिती संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, गाडगे महाराज यांच्यासह इतर संतांनी आरोग्यासंदर्भात दिलेले उपदेश याची माहिती देण्यात आली आहे. या माहितीची सांगड घालून संबंधित कीर्तनकारांनी आपला प्रबोधनाचा ढाचा तयार केला आहे. हे कीर्तनकार आता गावोगावी जाऊन समाजमनाचा जागर करणार आहेत.
 
जनजागरण करण्याची मोहीम
मानवी जीवनात गर्भधारणेपासून तर दोन वर्षापर्यंत म्हणजे पहिले एक हजार दिवस हे महत्त्वाचे असतात. याच काळात शरीराची आणि बुद्धीचीही बांधणी होत असते. त्यामुळे या काळात घ्यावयाची काळजी महत्त्वाची आहे. याशिवाय बालविवाहाचे आणि कमी वयात महिलांना मूल होण्याचे प्रमाण अधिक आहे. याबाबतची जागृती होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कीर्तनातून यासंदर्भातील पुराण व संतांचे संदर्भ घेऊन जनजागरण करण्याची ही मोहीम आहे.
-डॉ.गोपाल पंडगे, कार्यकारी अधिकारी, युनिसेफ
 

Web Title: Now the basis of keertankaran to prevent malnutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.