दहावीच्या प्रमाणपत्रावर आता जन्मस्थळही, मार्च २०१७ मध्ये झालेल्या परीक्षेपासून होणार निर्णयाची अंमलबजावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 08:52 PM2017-10-06T20:52:29+5:302017-10-06T20:53:22+5:30
इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दिल्या जाणा-या प्रमाणपत्रावर आता जन्मस्थळाचीही नोंद होणार आहे. मार्च २०१७ मध्ये झालेल्या परीक्षेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
पुणे : इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दिल्या जाणा-या प्रमाणपत्रावर आता जन्मस्थळाचीही नोंद होणार आहे. मार्च २०१७ मध्ये झालेल्या परीक्षेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे प्रमाणपत्रावर आता जन्मतारीखेसोबत जन्मस्थळही झळकणार आहे. परिणामी, यापुढील काळात अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्राला हे दहावीचे प्रमाणपत्र पर्याय ठरू शकते.
विविध कामांसाठी जन्मतारखेचा दाखला द्यावा लागतो. मात्र, अनेकांना हा दाखला न मिळाल्यास इयत्ता दहावीचे राज्य मंडळाने दिलेले प्रमाणपत्र त्यासाठी ग्राह्य धरले जाते. या प्रमाणपत्रावर नमूद केलेली जन्मतारीख सर्वच ठिकाणी पुरावा म्हणून मान्यता दिली जाते. शाळेकडे नोंद असलेली ही तारीख प्रमाणपत्रावर येते. त्यामुळे स्वतंत्र जन्मदाखला काढावा लागत नाही. त्याअनुषंगाने आता राज्य मंडळाने प्रमाणपत्रावर जन्मतारखेप्रमाणेच जन्मस्थळ नमूद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यापुढे विद्यार्थ्यांना जन्मस्थळाचीही नोंद असलेले प्रमाणपत्र दिले जाणार आहे. याबाबतची कार्यवाही मंडळाकडून सुरू करण्यात आली आहे.
प्रमाणपत्रावर जन्मस्थळाची नोंद झाल्यास विद्यार्थ्यांना अधिवासाचा पुरावा म्हणूनही त्याचा वापर करता येऊ शकतो. शाळेमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांच्या जन्मतारखेबरोबरच स्थळाचीही नोंद केली जाते. त्यानुसार शाळा सोडल्याचा दाखला व इतर कामांसाठी ही माहिती ग्राह्य धरली जाते. एकाच प्रमाणपत्रावर जन्मतारीख व जन्मस्थळाचीही नोंद होणार असल्याने विद्यार्थ्यांना पुढील काळात अधिवास दाखला स्वतंत्रपणे काढण्याची गरज भासणार नाही, अशी शक्यता आहे. अधिवास दाखला काढताना जन्मतारीख, जन्मठिकाणाची नोंद असलेले पुरावे सादर करावे लागतात. आता या दोन्ही नोंदी दहावीच्या प्रमाणपत्रावर असल्याने अधिवास प्रमाणपत्र म्हणूनही हे ग्राह्य धरले जावू शकते, अशी चर्चा आहे.
दरम्यान, याविषयी माहिती देताना मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे म्हणाल्या, दहावीच्या प्रमाणपत्रावर जन्मस्थळाचीही नोंद केली जाणार आहे. प्रमाणपत्रांवर नमूद जन्मतारीख शाळेत नोंद असलेली असते. तसेच शाळेकडे जन्मस्थळाचीही नोंद असते. तेच ठिकाण प्रमाणपत्रावर नमूद केले जाणार आहे. मार्च २०१७ परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देताना हा बदल केला जाणार आहे. नवीन प्रमाणपत्रावर जन्मतारखेबरोबच जन्मस्थळही नमूद केले जाणार आहे.
------------
परीक्षा अर्जावर भिन्नलिंगी पर्याय
इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा अर्जांवर आतापर्यंत लिंग या रकान्यात केवळ स्त्री व पुरुष असे पर्याय दिले जात होते. मात्र, आता राज्य मंडळाने त्यामध्ये भिन्नलिंगी (ट्रान्सजेंडर) हा पर्यायही दिला आहे. मार्च २०१८ मध्ये होणा-या परीक्षांसाठी भरण्यात येणा-या अर्जांवर पहिल्यांदाच असा उल्लेख करण्यात आला आहे.