"भाजपाला आता आमची गरज वाटत नाही"; मित्रपक्षाचा एकला चलो नारा, महायुतीला धक्का?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 04:43 PM2023-08-21T16:43:32+5:302023-08-21T16:44:39+5:30
राज्यात सध्या शिवसेना-राष्ट्रवादीत दोन गट पडलेत. त्याचा फायदा आपल्या पक्षाने घेतला तर उद्या महाराष्ट्रात येणारे चित्र बदलेल असं मत महादेव जानकर यांनी व्यक्त केले.
मुंबई – शिवसेना-भाजपा-रासप-आरपीआय अशा विविध पक्षांनी एकत्र येत राज्यात महायुतीची घोषणा केली होती. त्यातील आता आगामी निवडणुकीत महायुतीला पहिला धक्का बसला आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने एकला चलो रे ची भूमिका घेत निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. ना इंडिया, ना एनडीए आपण स्वबळावर लढू असं माजी मंत्री महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.
महादेव जानकर म्हणाले की, राज्यात आणि देशात आपला पक्ष वाढला पाहिजे, यासाठी गेल्या दीड महिन्यापासून राष्ट्रीय समाज पक्षाकडून जनस्वराज्य यात्रा काढली आहे. विठुरायाच्या दर्शनापासून आम्ही लोकांना जागे करण्यासाठी ही यात्रा काढत आहोत. अलीकडेच एनडीएची बैठक झाली त्यात आम्हाला निमंत्रण देण्यात आले नव्हते. सुरुवात त्यांची आहे. आम्हाला एनडीए असो वा इंडिया कुणी बैठकीला निमंत्रण केले नाही. त्यामुळे आपण स्वत: पुढे चालले पाहिजे. भीक मागून हक्क मिळत नाही. सत्ता घ्यायची असेल तर स्वत:च्या हिमतीवर घेतली पाहिजे असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत मोठा मासा छोट्या मासाला खातो, तसे मोठा पक्ष छोट्या पक्षांना खातो, त्यामुळे छोट्या पक्षानेही मला मोठे व्हायचे आहे हे ठरवले पाहिजे. आता रासपाने मोठं व्हायचं ठरवले आहे. या देशात भाजपा, काँग्रेस मोठे पक्ष आहेत. त्यांच्याबद्दल टीकाटिप्पणी करणे आवश्यक नाही. राज्यात सध्या शिवसेना-राष्ट्रवादीत दोन गट पडलेत. त्याचा फायदा आपल्या पक्षाने घेतला तर उद्या महाराष्ट्रात येणारे चित्र बदलेल. ही आमच्यासाठी संधी म्हणून पाहतोय. पक्ष वाढल्याशिवाय ही मंडळी आम्हाला विचारणार नाही. भाजपाला माझी, राजू शेट्टी, विनायक मेटे, रामदास आठवले यांची गरज होती. आता ती गरज वाटत नाही. त्यामुळे आपली ताकद वाढवली पाहिजे अशी भूमिका माजी मंत्री महादेव जानकर यांनी मांडली आहे.