आता केंद्राने राम मंदिरासाठी कायदा करावा - मा.गो.वैद्य
By admin | Published: March 11, 2017 10:08 PM2017-03-11T22:08:11+5:302017-03-11T22:08:11+5:30
राममंदिर हा देशातील कोट्यवधी नागरिकांच्या आस्थेशी जुळलेला मुद्दा आहे. उत्तरप्रदेशातील जनतेलादखेली राममंदिर हवे आहे.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 11 : राममंदिर हा देशातील कोट्यवधी नागरिकांच्या आस्थेशी जुळलेला मुद्दा आहे. उत्तरप्रदेशातील जनतेलादखेली राममंदिर हवे आहे. निकालांतून त्यांचा पाठिंबा स्पष्ट झालेला आहे. आता केंद्र सरकारने राम मंदिरासाठी कायदा करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ संघ विचारक मा.गो.वैद्य यांनी केले. उत्तरप्रदेश निवडणूकांच्या निकालांनंतर वैद्य यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
अयोध्येत ज्या ठिकाणी राम मंदिर होते ते पाडून त्याठिकाणी राम मंदिर बांधण्यात आले असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने मान्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात अद्याप निर्णय दिलेला नाही. या परिस्थितीत केंद्रातील भाजपच्या नेतृत्वातील सरकारने राम मंदिरासाठी कायदा करावा असे आवाहन वैद्य यांनी केले.
गोव्यातील पिछाडीला वेलिंगकर जबाबदार
गोव्याच्या निकालात भाजपाची पिछेहाट झाली आहे. संघाचे माजी संघचालक सुभाष वेलिंगकर हे यासाठी प्रामुख्याने जबाबदार आहेत. त्यांनी राजकीय महत्वाकांक्षा बाळगत केलेल्या बंडखोरीमुळे भाजपाला फटका बसला, असे मत वैद्य यांनी व्यक्त केले.
कॉंग्रेसने मोठे होणे आवश्यक
लोकशाही पद्धतीत २ मोठे पक्ष देशात असणे आवश्यक आहे. आजच्या घडीला कॉंग्रेस माघारला आहे. सुदृढ लोकशाहीसाठी कॉंग्रेसने मोठे होणे आवश्यक आहे. यासाठी कॉंग्रेसने गांधी घराण्याच्या परिघातून बाहेर निघण्याची आवश्यकता आहे, असे वैद्य यांनी रोखठोक प्रतिपादन केले.