आता राखीव निकाल लावण्याचे आव्हान!, हजारो विद्यार्थी अजूनही निकालाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 05:20 AM2017-09-21T05:20:01+5:302017-09-21T05:20:07+5:30
चार महिन्यांपासून निकाल न लावल्यामुळे सातत्याने टीकेचे धनी बनलेल्या मुंबई विद्यापीठाने सर्वच ४७७ निकाल जाहीर करून सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी अद्याप ९ हजार ७३० विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केलेले नाहीत.
मुंबई : चार महिन्यांपासून निकाल न लावल्यामुळे सातत्याने टीकेचे धनी बनलेल्या मुंबई विद्यापीठाने सर्वच ४७७ निकाल जाहीर करून सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी अद्याप ९ हजार ७३० विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केलेले नाहीत. विविध परीक्षेतील हे विद्यार्थी असून, त्यांच्याबरोबरच पुनर्मूल्यांकनासाठी आलेल्या अर्जांचा आकडा हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे आता हे निकाल लावण्याचे आव्हान आहे.
विद्यापीठाचे निकाल जाहीर झाले असले तरी अजूनही हजारो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपलेली नाही. त्यातच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २५ सप्टेंबर शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या मुदतीपूर्वी विद्यापीठ दोन्ही निकाल कसे लावणार आहे, याकडे विद्यार्थ्यांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, अजून काही दिवस मुंबई विद्यापीठाचा सर्व कारभार हा प्रभारी खांद्यावरच राहणार असल्याचे चिन्ह आहे. त्यामुळे सध्या फक्त उत्तरपत्रिका तपासणी आणि निकाल यावर विद्यापीठाने पुन्हा एकदा लक्ष केंद्रित केल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.
विद्यापीठाने राखून ठेवलेल्या निकालांमध्ये काही विद्यार्थ्यांना हजर असून गैरहजर दाखवले होते, त्यांचा प्रश्न अजून सुटलेला नाही. तर उत्तरपत्रिकांच्या सरमिसळीचा प्रश्नही विद्यापीठाला पूर्णपणे सोडवण्यात यश आलेले नाही.
>लवकरच निकाल जाहीर करणार
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी सांगितले की, राखीव निकाल जाहीर करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन प्रयत्नशील आहे. लवकरच निकाल जाहीर करण्यात येतील. राखीव सर्व निकाल पदव्युत्तर प्रवेशाची मुदत संपण्यापूर्वी जाहीर व्हावेत, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.