आता मानसिकता बदलण्याची पाळी

By Admin | Published: July 16, 2017 12:07 AM2017-07-16T00:07:12+5:302017-07-16T00:08:17+5:30

मासिक पाळीबद्दलचा समाजामधील दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. मासिक पाळीपूर्वी आणि पाळीनंतर महिलांमध्ये शारीरिक, बौद्धिक, वर्तनात्मक आणि मानसिक बदल होतात.

Now change the mindset | आता मानसिकता बदलण्याची पाळी

आता मानसिकता बदलण्याची पाळी

googlenewsNext

- प्रा. रचना जाधव-पोतदार

मासिक पाळीबद्दलचा समाजामधील दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. मासिक पाळीपूर्वी आणि पाळीनंतर महिलांमध्ये शारीरिक, बौद्धिक, वर्तनात्मक आणि मानसिक बदल होतात. मासिक पाळी हा शरीरधर्म आहे, तो विटाळ नाही. निसर्गाने संततीनिर्मितीसाठी तयार केलेली एक अत्यावश्यक संरचना आणि प्रक्रिया आहे. पाळीदरम्यान स्त्रियांना होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाबद्दल सहवेदना असायला हवी. शासनाने याबद्दल सकारात्मक निर्णय घेतला, तर हे शासन स्त्रियांप्रती सजग असल्याची जाणीव नागरिकांमध्ये रुजेल. आजच्या धकाधकीच्या जीवनात महिन्यातून एकदा, असह्य शारीरिक त्रासाच्या दिवसांत स्त्रीला आराम मिळाला, तर या गोष्टीचा तिच्या मानसिकतेवर सकारात्मक परिणाम होईल. यासाठी आता आपल्या सर्वांवरच मानसिकता बदलण्याची ‘पाळी’ आली आहे.
निसर्गाने संतती निर्मितीचे बहुतांश कार्य स्त्रीवरच सोपवले असल्याने, त्याच्याशी निगडित सर्व शारीरिक त्रासाचे सोपस्कार तिलाच पूर्ण करावे लागतात. तिच्या शरीराकडे संतती निर्मितीचा एक कारखाना वा उपभोग्य वस्तू म्हणून न पाहता, तिचे अस्तित्व म्हणून पाहायला हवे. मासिक पाळीबाबत समाजामध्ये अनेक मिथक आहेत. मासिक पाळीबाबत परस्परविरोधी विचारसरणी असलेले दोन गट समाजात अस्तित्वात आहेत. एक गट जो पुढारलेला आहे, मॉडर्न झालेला आहे. औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्या विकसित झाला आहे, तो गट मासिक पाळीकडे सामान्यपणे पाहतो. त्या गटातील लोकांच्या विचारसरणीत याबाबत कोणतेही मिथक नाहीत. तो गट मासिक पाळी सुरू असलेल्या स्त्रीवर कोणतीही बंधने लादत नाही. समाजातील असा गट पाश्चिमात्य देशात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. हा गट मासिक पाळीसोबत धर्माचे धागे जोडत नाही, तर दुसरा गट हा पहिल्या गटाच्या अगदी विरोधात आहे. अतिशय विचारांनी बुरसटलेला आहे. जो गट स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक करू देत नाही, इतरांची कामे करू देत नाही, कोणाच्या कपड्यांना, वस्तूंना हात लावू देत नाही. मासिक पाळीच्या काळात स्त्रीला स्वंयपाकघरात जाऊ देत नाही. घराबाहेरील झोपडीत वाळीत टाकल्यासारखी वागणूक देतो. एकंदरीत तिच्यावर विविध बंधने लादतो.
काही संशोधनातून अशी माहिती समोर आली आहे की, मासिक पाळीबाबत आपल्या परंपरांमध्ये चांगली भूमिका आहे. म्हणजे, मासिक पाळीच्या काळात एखाद्या स्त्रीला घराबाहेर, स्वयंपाक घराबाहेर ठेवणे अथवा स्त्रीला अशा काळात कपडे धुऊ न देणे, घरातील भांड्यांना हात लावू न देणे, सर्वांपासून लांब ठेवणे अशी बंधने फक्त तिला आराम मिळावा, तिच्या नित्याच्या कामांमधून तिला रजा मिळावी, या उद्देशाने तिच्यावर लादली होती, परंतु बुरसटलेल्या विचारसरणीच्या लोकांची याचा विपर्यास करून, स्त्रीला वाळीत टाकण्यापर्यंत मजल गेली. तिला आराम मिळण्याऐवजी चुकीची व अपमानास्पद वागणूक मिळू लागली. एकीकडे समाज, पुरुष, मिथके स्त्रियांवर मासिक पाळीच्या काळात बंधने लादत असताना, दुसरीकडे स्त्रियांकडून याला विरोध झाला नाही. अनेक ठिकाणी शिक्षणाच्या अभावी स्त्रिया या बंधनांचा विरोध करू शकल्या नाहीत.

सुट्टीबाबत २ मतप्रवाह..
- पाळीचा त्रास हा सर्वच महिलांना होतो, असेही नाही. ज्यांना या काळात प्रचंड त्रास होतो, त्यातल्या काही जणी डॉक्टरंच्या सल्ल्याने औषध घेऊन हा त्रास कमी करतात, परंतु या कारणासाठी डॉक्टरांकडे जाणे टाळणाऱ्याच अधिक असतात. त्यामुळे मासिक पाळीतील वेदना सहन करीत, अनेक महिला निमूटपणे आपले काम करीत राहतात. महिलांचा हा त्रास कमी करण्यासाठी त्यांना मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी सुट्टी देण्याची मागणी होऊ लागली. शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी ठरावाची सूचनाद्वारे ही मागणी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे केली आहे. 
काही कंपन्यांमध्ये महिलांना अशी सुट्टी सुरू करण्याचा विचार सुरू आहे. म्हात्रे यांचा उद्देश चांगला असला, तरी यास विरोध होण्याची शक्यता अधिक आहे. ही सुट्टी महिलांना मिळावी का, याबाबत महिलांमध्येच दोन मतप्रवाह आहे. वैद्यकीय रजेची सोय असताना, अशी मासिक पाळीसाठी सुट्टी मागून इतरांच्या नजरेत कमजोर का ठरावे? काही जणींना पहिल्या दिवशी नव्हे, तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी अधिक त्रास होतो. त्यामुळे ही रजा या काळात ज्या दिवशी त्या महिलेला हवी त्या वेळी मिळावी. मुळात ही सुट्टी असावी का? याबाबतही वाद सुरू आहे.
बरं सुट्टी दिली, तरी ही सुट्टी वरिष्ठ पदावर असलेल्या पुरुषांकडे मागणार का? यावरून त्या महिलेची थट्टा उडविली जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही, तसेच कौटुंबिक कारणासाठीही खोटे बोलून अशी रजा घेतली जाऊ शकते. मात्र, याची शहानिशा होणार कसे? असाही प्रश्न निर्माण होतो. अशा अनेक प्रश्नांमुळे या सुट्टीचा मुद्दा बाद झाला, तरी मासिक पाळीवर उघड चर्चा आणि महिलांचे त्रास जाणून घेण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरेल.

(लेखिका मानसशास्राच्या प्राध्यापिका आहेत.)
(शब्दांकन : अक्षय चोरगे)

Web Title: Now change the mindset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.