आता नागरिकांना पाणी तपासणीचे अधिकार
By admin | Published: September 15, 2016 01:51 AM2016-09-15T01:51:55+5:302016-09-15T01:52:33+5:30
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेची होणार मदत; अमरावती विभागातील २२ प्रयोगशाळा उपलब्ध.
नीलेश शहाकार
बुलडाणा, दि. १४ - आपण पितो ते पाणी दूषित आहे, किंवा घरी होणारा पाणीपुरवठा आरोग्यास धोकादायक आहे, असा संशय आपल्या मनात असेल, तर याचे निराकरण आता प्रत्येकाला करता येणार आहे. कारण आपल्याकडील पाण्याचे नमूने तपासणी करण्याची सुविधा भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेनी नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. यासाठी बुलडाणा जिल्ह्यात पाच शासकीय प्रयोगशाळांसह अमरावती विभागातील २२ शासकीय प्रयोगशाळा नागरिकांसाठी खुल्या झाल्या आहेत.
पाण्याच्या शुद्धतेची तथा स्वच्छतेची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था व पाणी पुरवठा योजनेकडे आधीपासूनच राहिली आहे. ग्रामपंचायती, नगरपालिका व महानगरपालिका यासाठी कटिबद्धही आहेत. शिवाय आरोग्य विभागाच्या प्रयोग शाळांमध्ये पाणी स्वच्छतेबाबत वारंवार तपासणी केली जाते. पाणी गुणवत्तेबाबतचा हा क्रम बदलून आता नागरिक स्वत: पाण्याची गुणवत्ता जाणून घेऊ शकणार आहेत.
घरातील पिण्याचे पाणी किंवा शेतीसाठी वापरात येणारे पाणी वापरास योग्य आहे का, हे जाणून घेण्यासाठी नागरिकांनी त्यांच्या वापरातील पाण्याचा नमुना भूजल सर्वेक्षणच्या प्रयोग शाळेत न्यायचा आहे. त्या ठिकाणी पाण्याची अनुजैविक व रासायनिक तपासणी करून २४ तासाच्या आत पिण्याच्या पाण्याची स्वच्छता व गुणवत्ता सांगितली जाईल. या आधारे नागरिकांना पाणी गुणवत्ता कार्ड दिले जाईल. त्यानुसार पाण्याची स्वच्छता व स्वत:चे आरोग्य सांभाळण्यास नागरिकांना मदत होणार आहे.
नागरिकांसाठी खुल्या खारपाणपट्टय़ाकडे विशेष लक्ष
अकोला, बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यांतील खारपाणपट्टय़ामध्ये येणार्या काही तालुक्यांत पाण्यामध्ये जास्त क्षार असल्यामुळे येथील नागरिकांमध्ये हाडे ठिसूळ होणे, किडनी निकामी होणे व दातांचे आजार मोठय़ा प्रमाणात आढळून येतात. बुलडाणा जिल्ह्यात घाटाखाली किडनी निकामी झाल्यामुळे कित्येकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या तीन जिल्ह्यांसाठी दोन नवीन प्रयोगशाळा प्रस्तावित आहेत. येथील पाण्यातील क्लोराइड व नायट्रेड नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न होणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यात पाच प्रयोगशाळा
बुलडाणा जिल्ह्यात होणारा पाणीपुरवठा दूषित आहे, अशी नागरिकांची नेहमी ओरड राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, मलकापूर व देऊळगावराजा येथील पाच प्रयोगशाळा नागरिकांसाठी खुल्या झाल्या आहेत. शिवाय आरोग्य विभागाकडे असलेली जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळा भूजल सर्वेक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अमरावती विभागातील नागरिकांसाठी खुल्या झालेल्या प्रयोगशाळा
जिल्हा प्रयोगशाळा
अमरावती 0५
यवतमाळ 0६
अकोला 0३
वाशिम 0२
बुलडाणा 0५
अमरावती 0१ (विभागीय प्रयोगशाळा)
पाणी गुणवत्तेत पारदर्शकता व नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी राज्य, विभाग व प्रत्येक जिल्हास्तरावर आजपासून सुरू होणार आहे. नागरिकांनी आरोग्याबाबत जागृकता दाखवत पाणी तपासणी करून घ्यावी.
डॉ.प्रवीण कथने,
प्रभारी उपसंचालक
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, अमरावती.