आता काँग्रेस करणार ‘शेतकऱ्यांशी चर्चा’

By Admin | Published: March 15, 2015 01:12 AM2015-03-15T01:12:31+5:302015-03-15T01:12:31+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाभडीतील ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाला २० मार्च रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र त्यानंतरही शेतकऱ्यांची स्थिती ‘जैसे थे’ आहे.

Now Congress will talk to farmers. | आता काँग्रेस करणार ‘शेतकऱ्यांशी चर्चा’

आता काँग्रेस करणार ‘शेतकऱ्यांशी चर्चा’

googlenewsNext

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाभडीतील ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाला २० मार्च रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र त्यानंतरही शेतकऱ्यांची स्थिती ‘जैसे थे’ आहे. त्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. खुद्द दाभडीतही शेतकरी आत्महत्या होत आहेत. मोदींच्या या ‘चाय पे चर्चा’ने शेतकऱ्यांच्या जीवनात काहीही बदल झाला नाही, हे जगाला पटवून देण्यासाठी आता काँग्रेस याच दाभडी गावात ‘शेतकऱ्यांशी चर्चा’ हा कार्यक्रम २० मार्चलाच घेत आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत ही माहिती दिली. मोघे म्हणाले, यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील दाभडी या गावातून लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी ‘चाय पे चर्चा’ च्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. भाजपाला एकहाती सत्ता द्या, तुमच्यावर आत्महत्येची वेळ येऊ देणार नाही, असा शब्द त्यांनी दिला होता. त्यानुसार शेतकऱ्यांनी भाजपच्या हाती एकहाती सत्ता दिली. नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनविले. मात्र मोदींना दाभडी आणि शेतकऱ्यांचा विसर पडला. २० मार्च रोजी दाभडीतील या ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाला एक वर्ष होत आहे. पर्यायाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या आजही सुरू आहेत. याच दाभडी गावातील शेतकऱ्यावरही आत्महत्येची वेळ आली. जेथून देशातील शेतकऱ्यांना संबोधित केले, त्या दाभडीतील आत्महत्याही मोदींना थांबविता आली नाही. मोदींची ‘चाय पे चर्चा’ कशी फसवी होती, हे आता काँग्रेस जगाला पटवून देणार आहे. त्यासाठी याच दाभडी गावात २० मार्च रोजी ‘शेतकऱ्यांशी चर्चा’ हा कार्यक्रम काँग्रेसने आयोजित केल्याचे मोघे यांनी सांगितले. ते म्हणाले, शेतकरी आत्महत्या प्रकरणी आघाडी सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आता त्यांच्याच काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. आता मुख्यमंत्री कुणावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार, असा प्रश्नही मोघे यांनी उपस्थित केला. (वार्ताहर)

चव्हाण, राणे, सातव येणार
‘शेतकऱ्यांशी चर्चा’ या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष खासदार राजीव सातव उपस्थित राहणार आहेत़

Web Title: Now Congress will talk to farmers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.