हिंदू राष्ट्रावर ‘मोहोर’ उठवणारा राष्ट्रपतीच आता देशाला हवा आहे! - उद्धव ठाकरे

By Admin | Published: June 9, 2017 07:50 AM2017-06-09T07:50:08+5:302017-06-09T07:53:48+5:30

देशाच्या राष्ट्रपती भवनात ‘जनतेचा’ माणूस व हिंदुत्ववादी विचारांचा माणूस हवा असेल तर सरसंघचालकांना राष्ट्रपती करून हिंदू राष्ट्र संकल्पनेवर शिक्कामोर्तब करायला हवे

Now the country wants the President to create 'Mohar' on the Hindu nation! - Uddhav Thackeray | हिंदू राष्ट्रावर ‘मोहोर’ उठवणारा राष्ट्रपतीच आता देशाला हवा आहे! - उद्धव ठाकरे

हिंदू राष्ट्रावर ‘मोहोर’ उठवणारा राष्ट्रपतीच आता देशाला हवा आहे! - उद्धव ठाकरे

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - देशाच्या राष्ट्रपती भवनात ‘जनतेचा’ माणूस व हिंदुत्ववादी विचारांचा माणूस हवा असेल तर सरसंघचालकांना राष्ट्रपती करून हिंदू राष्ट्र संकल्पनेवर शिक्कामोर्तब करायला हवे.  राष्ट्रपतीपदासाठी सरसंघचालकांचे मन वळवायलाच हवे!! असं स्पष्ट मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. आजपर्यंत सेक्युलर सरकारांचे ‘रबर स्टॅम्प’ राष्ट्रपती भवनात बसले. मग आता राममंदिर, समान नागरी कायदा, ३७० कलम हे रेंगाळलेले देशहिताचे प्रश्न सोडविण्यासाठी हिंदुत्वाचा ‘रबर स्टॅम्प’ राष्ट्रपती भवनात विराजमान झाला तर बिघडले कुठे? कारण हिंदू राष्ट्रावर ‘मोहोर’ उठवणारा राष्ट्रपतीच आता देशाला हवा आहे! असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. सामना संपादकीयच्या माध्यमातून त्यांनी आपलं मत मांडलं आहे. 
 
हिंदुस्थानच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाली आहे.   निवडणुकीचे जे वेळापत्रक जाहीर झाले आहे त्यानुसार १४ जुलै रोजी मतदान होईल व २० जुलै रोजी राष्ट्रपती नामक नव्या ‘रबर स्टॅम्प’ची घोषणा केली जाईल. सध्याची आकडेमोड पाहता पंतप्रधान मोदी यांच्याच पसंतीची व्यक्ती ही राष्ट्रपतीपदी विराजमान होईल, याविषयी कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
राष्ट्रपती कितीही अनुभवी असले तरी मार्गदर्शन करण्याशिवाय त्यांच्या हातात तसे दुसरे काहीच नसते. त्यामुळे कश्मीर प्रश्न, बेरोजगारी, शेतकऱयांच्या आत्महत्या आदी विषयांवर ते फक्त मार्गदर्शनच करू शकतात. राष्ट्रपती हे तिन्ही सेना दलांचे प्रमुख असतात, पण म्हणून कश्मीरप्रश्नी ते सेनापतींना युद्धाचे आदेश देऊ शकत नाहीत. अमेरिकेसारख्या देशाचे राष्ट्रपती थेट जनतेतून निवडून दिले जातात. त्यामुळे ते राष्ट्राचे खऱया अर्थाने कारभारी असतात. हिंदुस्थानी राष्ट्रपतींचे तसे नसते. देशाचे घटनात्मक प्रमुख म्हणून ते विराजमान असले तरी बऱयाच अर्थाने ते शोभेचेच पद झाले आहे असंही उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
राष्ट्रपती भवनात डॉ. अब्दुल कलाम किंवा प्रणव मुखर्जींसारखी व्यक्ती बसली की त्यातल्या त्यात त्या पदाची शान राहते, नाही तर राज्यकर्त्या पक्षास सोयीची असलेली व्यक्ती तेथे ब्रिटिशांच्या बग्गीतून थाटामाटात पाठवली जाते. हा एक थाटामाटाचा जंगी लग्नसोहळाच ठरतो. त्यामुळे येत्या २० जुलैला कुणाच्या डोक्यावर या वरातीचे बाशिंग बांधले जातेय तेच आता पाहायचे आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
 
राष्ट्रपती पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने अनेकांनी परस्पर मुंडावळय़ा आणि बाशिंगांची ऑर्डर दिली असली तरी पंतप्रधान मोदींच्या हाताने ज्यास मुंडावळय़ा बांधल्या जातील तोच नवरदेव ठरेल. हळूहळू रिंगण व रिंगणातील खेळाडूंची व्याप्ती वाढेल, पण आम्हाला विचाराल तर आम्ही आजही सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावावर ठाम आहोत असं उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.
 
देशाच्या राष्ट्रपती भवनात ‘जनतेचा’ माणूस व हिंदुत्ववादी विचारांचा माणूस हवा असेल तर सरसंघचालकांना राष्ट्रपती करून हिंदू राष्ट्र संकल्पनेवर शिक्कामोर्तब करायला हवे. सरसंघचालकांचे मार्गदर्शन एरव्ही देशाला होतच असते, पण घटनात्मक प्रमुख म्हणून राष्ट्रपती पदावरील त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. सरसंघचालक राष्ट्रपती पदावर विराजमान होणे हा आतापर्यंत ज्या विचारांसाठी रा. स्व. संघासह आपण सर्वांनी संघर्ष केला त्या विचारांचा विजय ठरेल. सरसंघचालकांचे मन वळवायलाच हवे!! अशी इच्छा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

Web Title: Now the country wants the President to create 'Mohar' on the Hindu nation! - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.