आता राजस्थानातून बोगस फार्मासिस्ट?, मंत्री गिरीश बापट यांचे निर्देश
By अतुल कुलकर्णी | Published: October 24, 2017 06:06 AM2017-10-24T06:06:16+5:302017-10-24T06:06:48+5:30
मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाने घेतलेल्या सुनावणीत फार्मासिस्टची पदवी राजस्थानातून घेतल्याचे अनेकांनी सांगितल्याने संशय निर्माण झाला आहे.
मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाने घेतलेल्या सुनावणीत फार्मासिस्टची पदवी राजस्थानातून घेतल्याचे अनेकांनी सांगितल्याने संशय निर्माण झाला आहे. त्यासंदर्भात मंत्री गिरीश बापट यांनी तातडीने चौकशी करण्याचे निर्देश महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलला दिले.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री गिरीश बापट यांच्यापुढे सुनावणीसाठी येणारे राजस्थानातून फार्मासिस्टचे शिक्षण घेतले, असे सांगताना दिसू लागले. आपल्याकडे फार्मासिस्ट आहेत की नाही, असा प्रश्नही मंत्र्यांनी अधिकाºयांना विचारला. काही प्रश्न त्यांनी राजस्थानी फार्मासिस्टनाच विचारले. तेव्हा त्यांनी आपण त्या गावचेच नाहीत, असे चेहरे केले. हा प्रकार संशयास्पद वाटू लागल्याने अखेर बापट यांनी चौकशीचे निर्देश दिले.
मंत्र्यांना अर्धन्यायिक सुनावण्या घेण्याचा अधिकार असतो. त्यानुसार फार्मासिस्ट, रेशन दुकानदारांवर एफडीए अधिकाºयांकडून होणाºया कारवाईविरोधात दाद मागता येते. मात्र गेले काही महिने सुनावणीला येणाºया दहापैकी किमान सहा फार्मासिस्टनी आपण राजस्थानचे आहोत, तेथून शिक्षण घेऊन येथे आलो, असे मंत्र्यांना सांगितले. प्रश्न विचारल्यावर त्यांना व्यवस्थित उत्तरे देता आली नाहीत.
त्यामुळे बापट यांनी महाराष्टÑ स्टेट फार्मसी कौन्सिलला पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात, ‘सौंदर्य प्रसाधने नियम १९४५ अंतर्गत सुनावणीस येणाºया अनेक प्रकरणांत फार्मासिस्ट राजस्थानातून आल्याचे सांगतात. त्यांना फार्मसीचे पुरेसे ज्ञान नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे त्यांनी खरोखरच फार्मसीचे शिक्षण घेऊन रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणून नोंदणी केली आहे का? याविषयी शंका येत आहे.
योग्य अर्हता प्राप्त व्यक्तीचीच महाराष्टÑात फार्मासिस्ट म्हणून नोंदणी होत आहे का? त्यासाठी कोणती कार्यपद्धती राबविण्यात येत आहे, काय खातरजमा केली जाते? याची माहिती द्यावी, असे बापट यांनी कळवले आहे. फार्मसी कौन्सिलने त्यावर अजून उत्तर दिलेले नाही. मात्र हा प्रकार संशयास्पद असल्याचे बापट यांचे म्हणणे आहे.
एफडीएच्या एका अधिकाºयाने सांगितले की, या प्रकाराची सखोल चौकशी व्हायला हवी. आमच्या अधिकाºयांना अनेक फार्मासिस्ट भेटतात. चौकशीतून मोठे रॅकेट समोर येऊ शकते, असेही तो अधिकारी म्हणाला.