राज्यभरात आता २४ तास खा, प्या अन् खरेदीही करा, दुकाने, रेस्टॉरन्ट्स रात्रभर राहणार खुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 05:10 AM2017-08-11T05:10:16+5:302017-08-11T05:10:21+5:30
राज्यभरातील दुकाने, मॉल्स, रेस्टॉरन्ट्ससह अन्य व्यावसायिक प्रतिष्ठाने रात्रभर सुरू ठेवण्यासाठी दुकाने व आस्थापना (गुमास्ता) कायद्यात बदल करण्यासंबंधीचे विधेयक विधानसभेत बुधवारी मध्यरात्री मंजूर करण्यात आल्याने आता रात्रभर खाण्यापिण्याची चंगळ अनुभवता येणार आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यभरातील दुकाने, मॉल्स, रेस्टॉरन्ट्ससह अन्य व्यावसायिक प्रतिष्ठाने रात्रभर सुरू ठेवण्यासाठी दुकाने व आस्थापना (गुमास्ता) कायद्यात बदल करण्यासंबंधीचे विधेयक विधानसभेत बुधवारी मध्यरात्री मंजूर करण्यात आल्याने आता रात्रभर खाण्यापिण्याची चंगळ अनुभवता येणार आहे.
या निर्णयाने मुंबईत नाइट लाइफ बिनबोभाट सुरू होणार असे मात्र नाही. मुंबईसह राज्यभर अनेक बंधनेही सरकारने टाकली आहेत. कोणत्या भागात कोणत्या आस्थापना किती वेळ सुरू ठेवायच्या याचा अधिकार पोलीस विभागाला असेल. त्यासाठी पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागेल. ज्या आस्थापनांमध्ये ५० पेक्षा अधिक महिला काम करतात त्या ठिकाणी पाळणाघराची व्यवस्था मालकांना करावी लागेल. शंभरहून अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांमध्ये कर्मचाºयांसाठी कँटिनची व्यवस्था करणे अनिवार्य असेल.
महिला कर्मचाºयांना रात्रीच्या वेळी त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचविण्याची जबाबदारी ही आस्थापना मालकांची असेल. तसेच प्रत्येक आस्थापनेत सीसीटीव्ही लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.
सध्याचा नियम काय म्हणतो...
सध्या दुकाने, आस्थापना रात्री दहापर्यंत बंद करावी लागतात. १५ मिनिटांची वाढीव वेळ असते. रेस्टॉरंट्स रात्री साडेबारापर्यंत बंद करावी लागतात. एक तास वाढीव वेळ पोलीस परवानगीने घेता येतो. पानटपºया रात्री ११च्या आत, तर व्यावसायिक प्रतिष्ठाने रात्री साडेनऊला बंद करावी लागतात.
विधान परिषदेत परीक्षा बाकी
याच विधेयकात दहापेक्षा कमी कर्मचारी असलेल्या लहान आस्थापनांना परवान्यांची गरज नसेल, अशी तरतूद करण्यात आली आहे. त्याचा फायदा ३८ लाख आस्थापनांना होईल आणि इन्स्पेक्टर राज संपुष्टात येणार आहे.
या विधेयकातील तरतुदींचे उल्लंघन करणाºया आस्थापना मालकांना तसेच एखाद्या कर्मचाºयाचा अपघात झाल्यास मालकास २ ते ५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद या विधेयकात आहे.
हे विधेयक विधान परिषदेत मंजूर व्हावे लागेल आणि राज्यपालांच्या मंजुरीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल.
हॉटेलचालक आणि खवय्यांच्या दृष्टीने हा फायदेशीर निर्णय आहे. विशेषत: मुंबईसारख्या शहरांत तीन शिफ्टमध्ये कार्यालये सुरू असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेसही चाकरमान्यांना जेवणाचा पर्याय उपलब्ध असेल.
- संतोष शेट्टी, सचिव-आहार
२४ तास दुकाने खुली ठेवण्याच्या निर्णयाचा फायदा व्यापाºयांसह ग्राहकांनाही होईल. रात्री-अपरात्री घरी परतणाºया ग्राहकांना हवे ते आणि हवे तेव्हा उपलब्ध होईल.
- मोहन गुरूनानी, व्यापाºयांचे नेते