अनिल देशमुखांच्या कंपन्यांनी घेतलेल्या कर्जाकडे ईडीचा मोर्चा, नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 11:23 AM2021-08-12T11:23:51+5:302021-08-12T11:24:02+5:30
देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या विविध कंपन्यांसाठी ही कर्जे उचलण्यात आली आहेत. मात्र, त्यापैकी बहुतांश कंपन्या या केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
जमीर काझी -
मुंबई : गेल्या साडेतीन, चार महिन्यांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहाराची शहानिशा करणारे सक्तवसुली संचालनालय (ईडी) आता त्यांनी विविध बँकांतून घेतलेल्या कर्जाची सूक्ष्म तपासणी सुरू करत आहे.
देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या विविध कंपन्यांसाठी ही कर्जे उचलण्यात आली आहेत. मात्र, त्यापैकी बहुतांश कंपन्या या केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध बँकांनी अनियमितपणे या शेल कंपन्यांसाठी कर्ज दिल्याचा संशय आहे. त्यामुळे त्याबाबत प्राधान्याने माहिती घेण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
आतापर्यंतच्या ईडीच्या तपासात देशमुख यांनी खासगी बँकांकडून अनेक असुरक्षित कर्जे घेतल्याचे आढळले आहे. ती मंजूर करताना नियमांचे उल्लंघन केले गेले असून, कर्जाचे पैसे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मालकीच्या कंपन्यांकडे वर्ग करण्यात आले असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे. तसेच या कंपन्यांपैकी, ज्यांना कर्ज वाटप झाले त्यापैकी अनेक कंपन्या केवळ कागदावरच आहेत. त्यामुळे देशमुख यांनी किती बँकांकडून किती कर्ज घेतले होते, त्याची रक्कम किती होती, याचा ईडी तपास करीत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
ईडीने आतापर्यंत देशमुख यांना चौकशीसाठी ४ वेळा, तर त्यांचे पुत्र ऋषिकेश व पत्नी आरती यांना अनुक्रमे दोन व एक वेळा चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले. मात्र, हे चौकशीला हजर राहिलेले नाहीत. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतरच चौकशीला सामोरे जाऊ, असे अनिल देशमुख यांनी जाहीर केले आहे.
वादग्रस्त आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी मुंबईच्या आयुक्त पदावरून उचलबांगडी झाल्यानंतर २० मार्चला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून १०० कोटी हप्ता वसुलीचा त्यांच्यावर आरोप केला. त्याबाबत सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीने देशमुख यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.