आता ग्रामपंचायतीत भरा वीज, मोबाईल बिल
By admin | Published: November 11, 2014 11:38 PM2014-11-11T23:38:54+5:302014-11-11T23:41:34+5:30
उत्पन्न वाढविण्यावर भर : ग्राम प्रशासन सुधारणा अभियाने
कोल्हापूर : राजर्षी शाहू ग्राम प्रशासन सुधारणा अभियानांतर्गत प्रायोगिक तत्त्वावर आजरा तालुक्यातील उत्तूर ग्रामपंचायतीमध्ये एस.टी. बस तिकीट बुकिंग आणि हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली ग्रामपंचायतीमध्ये वीज बिल भरणा केंद्र सुरू केले जात आहे. दोन्ही ठिकाणी ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही भर पडत आहे. या ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये पहिल्या टप्प्यात वीज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
गावपातळीवरच अधिकाधिक सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढल्यानंतर गावच्या विकासाला गती मिळेल. मूलभूत सुविधा चांगल्या देता येणे शक्य होईल. त्यामुळे सर्वच ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढावे यासाठी जिल्हा परिषद प्रयत्न करत आहे.
पहिल्या टप्प्यात उत्तूर आणि पुलाची शिरोली ग्रामपंचायतीची निवड करून अंमलबजावणी केली जात आहे. दोन्ही गावांची लोकसंख्या पंधरा हजारांपेक्षा जास्त आहे. वीज बिल भरण्याची सुविधा ग्रामपंचायतीमध्येच झाल्यामुळे बिले वेळेत भरण्याचे प्रमाण वाढले आहे. शिरोली येथे आॅगस्टपासून वीज भरणा सुरू आहे. एक वीज बिल भरून घेतल्यानंतर ग्रामपंचायतीला साडेतीन रुपये मिळतात. त्यामुळे ग्रामपंचायतीला उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण झाला आहे. रेल्वे तिकीट बुकिंगचीही सुविधा येथे लवकरच सुरू होणार आहे. उत्तूर ग्रामपंचायतीमध्ये दोन महिन्यांपूर्वी बस तिकीट व आरक्षण बुकिंगची सुविधा सुरू असून उत्तम सुविधा दिली जाते. या सेवेतून ग्रामपंचायतीला आतापर्यंत १९ हजार रुपयांवर कमिशन मिळाले आहे. या दोन्ही ठिकाणी उपक्रम यशस्वी झाल्यानंतर सर्वच ग्रामपंचायतींमध्ये वीज बिल भरणा केंद्र सुरू करण्यावर जि. प. प्रशासन, पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यास ग्रामस्थ, ग्रामपंचायतींचा वेळ आणि पैसा वाचण्यास मदत होईल.
जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वीज बिल भरणा आणि बस तिकीट बुकिंंग केले जात आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रीयीकृत बँकेचे खाते उघडणे व अन्य व्यवहाराचीही सुविधा केली आहे. त्यातून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर पडत आहे. सर्वच ग्रामपंचायतीमध्ये वीज बिल भरणा करण्यासाठी गांभीर्याने विचार केला जाईल.
- अविनाश सुभेदार,
मुख्य कार्यकारी अधिकारी
दोन महिन्यांपासून पुलाची शिरोली ग्रामपंचायतीमध्ये वीज बिल भरणा करून घेतला जात आहे. ग्रामस्थांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एका बिलापोटी साडेतीन रुपये ग्रामपंचायतीला मिळणार आहे. रेल्वे तिकीट, आरक्षण करण्याचीही सुविधा लवकरच सुरू करण्यात येईल.
- ए. एस. कटारे,
ग्रामविकास अधिकारी, पु.शिरोली
उत्पन्न आणि सुविधादेखील
ग्रामीण भागात आधुनिक सुविधाही मिळाव्यात आणि ग्रामपंचायतींना उत्पन्नही मिळावे, यासाठी ‘अपना सीएससी’ या संकेतस्थळावरून मोबाईल व डीटीएच रिचार्ज, एस.टी. बस तिकीट बुकिंग, मोबाईल बिल भरणा यासारख्या सुविधा देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. यामुळे ग्रामस्थांना गावातच सेवा मिळेल, तसेच ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातदेखील वाढ होईल.