आता एलिव्हेटेड प्रकल्प अंधेरी ते विरार
By admin | Published: May 13, 2015 01:54 AM2015-05-13T01:54:03+5:302015-05-13T01:54:03+5:30
बहुचर्चित असा चर्चगेट-विरार एलिव्हेटेड (उन्नत) प्रकल्प रेल्वे आणि राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे रखडला आहे. आता हाच प्रकल्प अंधेरी ते
मुंबई : बहुचर्चित असा चर्चगेट-विरार एलिव्हेटेड (उन्नत) प्रकल्प रेल्वे आणि राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे रखडला आहे. आता हाच प्रकल्प अंधेरी ते विरारपर्यंत पूर्ण करण्याचा विचार होत असल्याचे एमआरव्हीसीकडून सांगण्यात आले. यासाठी शासनासोबत बोलणीही सुरू आहेत.
पश्चिम रेल्वे प्रवाशांना जादा लोकल आणि फेऱ्या उपलब्ध करण्यास चर्चगेट ते विरार असा एलिव्हेटेड प्रकल्प राबविण्यात येणार होता. रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारमधील वादविवादामुळे हा एलिव्हेटेड प्रकल्प चांगलाच रेंगाळला. या प्रकल्पासाठी राज्य सरकारचीही जागा लागणार असल्याने त्यांचे सहकार्य आवश्यक होते. त्यासाठी राज्य सहकार्य करार होणे अपेक्षित होते. मात्र दीड वर्षात हा करार झाला नाही. अखेर काही महिन्यांपूर्वीच रेल्वे बोर्डाने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून एलिव्हेटेड प्रकल्पासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची विनंती केली. त्यावर राज्य सरकारनेही सकारात्मक भूमिका घेतली. मात्र रेल्वेच्या चर्चगेट-विरार एलिव्हेटेड प्रकल्पाला समांतर असा मेट्रो-३ कुलाबा-वांद्रे-सीप्झ प्रकल्प असल्याने आणि एलिव्हेटेड प्रकल्पात जागाही बरीच जात असल्याने एलिव्हेटेड प्रकल्प अंधेरी ते विरार करण्याचा विचार राज्य सरकार आणि रेल्वेकडून केला जात आहे. यासंदर्भात एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांना विचारले असता, मुख्यमंत्र्यांसोबत रेल्वेमंत्री आणि अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत हा प्रकल्प अंधेरी ते विरार करण्याचा विचार पुढे आला होता. यावरच आता रेल्वेकडून विचार केला जात आहे.