कृषी विज्ञान केंद्राचे देशात आता अकरा विभाग !
By Admin | Published: August 26, 2015 12:54 AM2015-08-26T00:54:24+5:302015-08-26T00:54:24+5:30
दमण-दीवसह तीन राज्यांचे मुख्यालय पुण्यात.
अकोला : शेतीचा पाया भक्कम करण्यासाठी अद्ययावत शेती तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत नेण्याची खरी गरज असल्याने कृषी मंत्रालयाने कृषी विज्ञान केंद्राचा (केव्हीके)विस्तार व बळकटीकरणावर भर दिला आहे. त्यासाठी देशात अकरा विभाग केले असून, दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशासह महाराष्ट्र, गोवा व गुजरात या तीन राज्यांचे नवे मुख्यालय पुणे येथे सुरू करण्यात येत आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेती तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत सहज पोहोचवता येत असल्याने कृषी विज्ञान केंद्राचा विस्तार करण्यावर भर देण्यात आला असून, या केंद्राचे व्यवस्थापन सुलभ होण्यासाठी केव्हीकेचे विभाग वाढविण्यात आले आहेत. या अगोदर देशात नऊ विभाग होते. आता अकरा विभाग करण्यात आले आहेत. कृषी विद्यापीठे, कृषी संस्थांनी अनेक मोलाचे कृषी तंत्रज्ञान विकसित केले आहे. तथापि, हे अद्ययावत तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहोचवणे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शक्य असल्याने देशात नवी १0९ कृषी विज्ञान केंद्रे सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय कृषी मंत्रालयाने घेतला आहे. त्याचसोबत या केंद्रांना बळकट करण्यासाठी शास्त्रज्ञांची संख्या ६ वरू न ९ करण्यात आली आहे. या अगोदर त्यांना विषय विशेषज्ञ म्हटले जात होते, आता त्यांना वरिष्ठ शास्त्रज्ञ असे पदनाम देऊन पगारात वाढ करण्यात आली आहे. या वरिष्ठ शास्त्रज्ञांसह या केंद्राच्या इतर २२ तज्ज्ञ कर्मचार्यांचे वर्ग वाढविण्यात आले आहे. शेती विकासासाठी कृषी विद्यापीठांसह कृ षी विज्ञान केंद्रे काम करीत असून, विविध शेती तंत्रज्ञान शेतकर्यांच्या शेतापर्यंत नेण्यासाठीची मोलाची जबाबदारी पार पाडीत आहे. देशात आजमितीस ६४२ कृषी विज्ञान केंद्रे आहेत. यातील ४४ कृषी विज्ञान केंद्रे या राज्यात असून, १३ कृषी विज्ञान केंद्रे ही विदर्भात आहेत. त्यापैकी सात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत तर सहा केंद्रे इतर संस्था चालवित आहेत. कृषी विद्यापीठाच्या शिक्षण विस्तार संचालनालयामार्फत केव्हीकेचे कामकाज चालते. पुण्यात कृषी तंत्रज्ञान संशोधन संस्था पुणे येथील विभागाचे कृषी तंत्रज्ञान संशोधन संस्था असे नामकरण करण्यात आले आहे. या अगोदर हैद्राबाद येथील झोनल कार्यालयांतर्गत महाराष्ट्राचे काम चालत होते.