आता शिवसेनेचे खासदारही अस्वस्थ; दोन गट पडणार, उद्धव ठाकरेंना धक्का बसणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 08:49 AM2022-07-07T08:49:05+5:302022-07-07T08:49:41+5:30

राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने फुटीची शक्यता, खासदार फुटले तर राज्यातील सत्ता हातून गेलेल्या ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का बसेल.

Now even Shiv Sena MPs are upset; Will there be two groups, will Uddhav Thackeray be shocked? | आता शिवसेनेचे खासदारही अस्वस्थ; दोन गट पडणार, उद्धव ठाकरेंना धक्का बसणार?

आता शिवसेनेचे खासदारही अस्वस्थ; दोन गट पडणार, उद्धव ठाकरेंना धक्का बसणार?

Next

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील खासदारांमध्येही चलबिचल असल्याचे दिसत आहे. जवळपास १२ खासदार हे शिंदेंसोबत जातील, असे म्हटले जात आहे. त्यातच राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेच्या खासदारांमध्ये दोन गट पडण्याची चिन्हे आहेत.

दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी भाजपच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे आदेश पक्षाच्या खासदारांना द्या, असे पत्र मंगळवारीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे.  शिंदे यांच्यासोबत जाण्याची स्पष्ट भूमिका शिवसेनेच्या एकाही खासदाराने आतापर्यंत घेतलेली नाही. मात्र, १२ खासदार हे शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले जाते. माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी तसा दावा केला आहे. शिवसेनेच्या चार खासदारांनी बंडाच्या काळात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतल्याचे वृत्त एका वाहिनीने दिले होते. भाजपच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा दबाव पक्षातील अधिकाधिक खासदारांकडून येऊ शकतो. 

खासदार फुटले तर राज्यातील सत्ता हातून गेलेल्या ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का बसेल. पक्षावरील ताब्यावरून नजीकच्या काळात ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्या संघर्षात खासदारही साथ सोडून गेले तर 
ठाकरे यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार आहे. 

ठाकरे काय निर्णय घेणार?
भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी आधीच घेतली आहे. अशावेळी त्यांनी काँग्रेस व विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तर शिवसेना खासदारांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. 
सिन्हा यांना पाठिंबा दिला तर खासदार फुटतात आणि द्रौपदी मुर्मू यांच्या पाठीशी उभे राहिले तर सत्ता हिसकावून घेणाऱ्या भाजपबरोबर जावे लागेल, अशी उद्धव ठाकरे यांची कोंडी होऊ शकते. मात्र, दोनपैकी एक निर्णय त्यांना घ्यावाच लागेल. 

शिंदेंच्या खासदार मुलाची भूमिका काय?
शेवाळे खासदार असलेल्या मतदारसंघातच शिवसेना भवन येते. त्या ठिकाणचे आमदार सदा सरवणकर हे आधीच शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी, शिंदे यांच्या बंडाच्या काळात ठाकरे यांना एक पत्र देऊन भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच्या आमदारांच्या मागणीचा विचार करावा, अशी मागणी ठाकरे यांच्याकडे केली होती.  एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे कल्याणचे खासदार आहेत आणि आपल्या वडिलांच्या समर्थनार्थ त्यांनी बंडानंतर लगेच आघाडी उघडली होती. 

भावना गवळींना मुख्य प्रतोद पदावरून हटविले; राजन विचारे लोकसभेतील नवे मुख्य प्रतोद
शिवसेनेतील लोकसभा गटात दुफळी होण्याची शक्यता वर्तविली जात असताना शिवसेनेने लोकसभेतील मुख्य प्रतोद पदावरून खासदार भावना गवळी यांची बुधवारी हकालपट्टी करून संभाव्य दुफळीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला आहे. खासदार गवळी यांच्या जागी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांची नियुक्ती केली. यासंदर्भात शिवसेनेने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला व केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्राद्वारे या निर्णयाची माहिती दिली आहे. लोकसभेच्या शिवसेना प्रतोद पदावरून खासदार भावना गवळी यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर अजून किती जणांची पक्षातून हकालपट्टी करणार, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला.  शेवाळे यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मुर्मू यांना समर्थन देण्याची घेतलेली भूमिका योग्य असल्याचेही शिंदे म्हणाले.

हे आहेत शिवसेनेचे खासदार 

गजानन कीर्तीकर, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, डॉ.श्रीकांत शिंदे, विनायक राऊत, धैर्यशील माने, संजय मंडलिक, श्रीरंग बारणे, राजन विचारे, राजेंद्र गावित, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, प्रतापराव जाधव, भावना गवळी, कृपाल तुमाने, हेमंत पाटील, संजय (बंडू) जाधव, ओमराजे निंबाळकर.

Web Title: Now even Shiv Sena MPs are upset; Will there be two groups, will Uddhav Thackeray be shocked?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.