शेतकरी कर्जमाफीसाठी आता रिपाइंही रिंगणात
By admin | Published: April 6, 2017 05:41 AM2017-04-06T05:41:36+5:302017-04-06T05:41:36+5:30
विधान भवनाबाहेर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असताना, भारतीय जनता पार्टीच्या मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियानेही (ए) कर्जमाफीची मागणी केली
मुंबई : शेतकरी कर्जमाफीवरून विधान भवनाबाहेर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असताना, भारतीय जनता पार्टीच्या मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियानेही (ए) कर्जमाफीची मागणी केली आहे. मात्र, ही शेवटची कर्जमाफी असावी, असे आवाहनही रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अप्पा कातकडे यांनी सरकारला केले आहे.
कातकडे म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी कर्जमाफी हा कधीही योग्य पर्याय ठरू शकत नाही. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या कर्जमाफीबाबत त्यांचे आभार मानायला हवेत. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेवटची कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. मात्र, ही शेवटची कर्जमाफी करून सरकारने शेतकरी कर्जबाजारी होऊ नयेत, यासाठी ठोस उपाययोजना करावी.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्याची प्रमुख मागणीही रिपाइंने केली आहे. यामध्ये आत्तापर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वारसदाराला पात्रतेनुसार शासकीय नोकरीत सामावून घेण्याची मागणी रिपाइंने केली आहे, तर ज्या वारसांची पात्रता नसेल, त्यांना स्किल इंडियांतर्गत ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी आणि विनातारण कर्जपुरवठा करावा, शिवाय या कर्जफेडीसाठी सुलभ हफ्त्यांची व्यवस्थाही सरकारने करावी, अशी मागणी रिपाइंने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. (प्रतिनिधी)