तिकिटाप्रमाणे आता खाद्यपदार्थांच्या बिलाची पण होणार तपासणी
By Appasaheb.patil | Published: July 10, 2019 12:32 PM2019-07-10T12:32:19+5:302019-07-10T12:35:28+5:30
मध्य रेल्वे : स्थानकावर झळकू लागले ‘नो बिल... नो पेमेंट... नो टिप...’ चे बोर्ड
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह धावत्या गाडीतील विक्रेत्यांनी ग्राहकांना/प्रवाशांना बिल देणे बंधनकारक केले आहे़ याबाबतचे आदेश रेल्वे मंत्र्यांच्या सूचनेनुसार विभागीय व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा यांनी काढले आहेत़ याबाबतची कडक अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे़ यासाठी स्थानकावरील प्रत्येक खाद्यपदार्थ स्टॉलवर ‘नो बिल... नो पेमेंट...नो टिप...’ असे फलक झळकाविण्यात आले आहेत़ रेल्वे स्थानक किंवा गाडीतील प्रवाशांकडील असलेल्या खाद्यपदार्थांविषयी माहिती घेऊन त्यांच्याकडे बिल आहे का नाही, याबाबतची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मागील काही महिन्यांपासून रेल्वे स्थानकासह धावत्या गाड्यांमध्ये अनधिकृत विक्रेत्यांची मुजोरी वाढली आहे. या प्रकारातून प्रवाशांकडून अधिकचे पैसे घेऊन दमदाटी करण्याचे प्रकार समोर आले आहेत़ या प्रकारांना आळा घालण्यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार देशातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर नो पेमेंट... नो बिल.. नो टिप... असे फलक प्रत्येक स्टॉलवर झळकाविण्यात आले आहेत.याबाबतची अंमलबजावणी सोलापूर मंडलातील सर्वच स्थानकांवर करण्यास सुरुवात केली आहे़ रेल्वे प्रशासनाकडून या उपक्रमाचे व्यापक नियोजन केले आहे़ या उपक्रमात विक्रेते ग्राहकांना बिल देतात किंवा नाही, याची वेळोवेळी पडताळणी केली जाणार आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर डमी ग्राहक पाठविण्यात येणार असल्याचेही रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले.
स्टॉलधारकांचा परवाना होणार रद्द
- सोलापूर विभागामधील प्रत्येक सेक्शनमध्ये स्थानकावर गाडी थांबल्यानंतर गाडीमध्ये जाऊन प्रवाशांकडे असलेल्या तिकिटाप्रमाणेच बिलाची पण तपासणी केली जाणार आहे़ या तपासणीनंतर प्रवाशांकडून ते खाद्यपदार्थ कोणत्या ठिकाणांहून खरेदी केले़़़ बिल घेतले नसेल तर ते का नाही घेतले़़़़स्टॉलधारकाने बिल देण्यास टाळाटाळ केली का़़़ यासह सर्व बाबींची चौकशी करून तसा अहवाल तयार करण्यात येणार आहे़ त्यानंतर संबंधितावंर कारवाई करण्यात येईल, वारंवार असा प्रकार होत असल्यास त्या स्टॉलधारकांचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचेही रेल्वे प्रशासनाने सांगितले़
बिल न दिल्यास प्रवाशांनी वस्तूचे पैसे देऊ नये...
- सोलापूर विभागात नो बिल़़़नो पेमेंट... अभियानांतर्गत स्थानकावर आणि गाडीमधील प्रवाशांच्या तिकिटासोबत खानपानाचे बिल मिळते की नाही, याची तपासणी होणार आहे़ रेल्वे स्थानकावर आणि गाडीमध्ये खानपानाची वस्तू खरेदी केल्यानंतर त्या स्टॉलमधून किंवा गाडी पॅन्ट्रीकारमधून बिल देणे बंधनकारक करण्यात आले आहे़ विभागातील प्रत्येक रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरून प्रवाशांनी कुठलाही पदार्थ खरेदी करताना छापील किमतीपेक्षा अधिक पैसे देऊ नयेत, तसेच स्टॉलधारकाकडून खाद्यपदार्थाचे बिल मागून घ्यावे, विक्रेत्याने बिल न दिल्यास वस्तूचे पैसे देऊ नयेत, अशा सूचना रेल्वे प्रशासनाने दिल्या आहेत़ यानंतरही काही अडचणी असल्यास रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रदीप हिरडे यांनी केले आहे़
सोलापूर विभागात नो बिल...नो पेमेंट... अभियानाची प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे़ शिवाय विभागातून धावणाºया गाड्यांमधील पॅन्ट्रीकार असणाºया गाड्यांमधील प्रवाशांकडून यासंदर्भात माहिती घेतली जात आहे़ काही स्टॉलवर बिल देण्याबाबत अनियमितता समोर आल्या आहेत. त्याबाबतचा अहवाल तयार करण्यात आला असून, त्याच्यावर नक्कीच कारवाई होईल़ प्रवाशांनी स्थानकावर व गाडीमध्ये खानपानाची वस्तू खरेदी केल्यानंतर बिलाची मागणी करावी़
- प्रदीप हिरडे, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक, सोलापूर मंडल