आता दिवाळी पहाटवरुन शिंदे-ठाकरे गट आमनेसामने; कोणाला मिळणार जागा? होऊ द्या दोन कार्यक्रम 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 05:34 AM2022-10-16T05:34:22+5:302022-10-16T05:35:35+5:30

आता ‘दिवाळी पहाट’च्या निमित्ताने बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष आमनेसामने आले आहेत.

now for diwali program shinde thackeray group face to face who will get the ground let there be two events | आता दिवाळी पहाटवरुन शिंदे-ठाकरे गट आमनेसामने; कोणाला मिळणार जागा? होऊ द्या दोन कार्यक्रम 

आता दिवाळी पहाटवरुन शिंदे-ठाकरे गट आमनेसामने; कोणाला मिळणार जागा? होऊ द्या दोन कार्यक्रम 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावरून शिंदे आणि ठाकरे गटात चांगलेच घमासान झाले होते. आता ठाण्यात ‘दिवाळी पहाट’च्या निमित्ताने बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष आमनेसामने आले आहेत. १० वर्षे डॉ. मुस रोडवर ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे हे दिवाळी पहाट आयोजित करतात; पण आता शिंदे गटाने दिवाळी पहाटसाठी महापालिका व पोलिसांकडे अर्ज केला आहे. यावरून दिवाळीत ठाण्यात शिमगा पाहायला मिळणार आहे.

 खा. विचारे यांच्या संस्थेच्या माध्यमातून डॉ. मुस रोड येथे दरवर्षी दिवाळी पहाट आयोजित केली जाते. मुंबईत दसरा मेळाव्यासाठी ज्या पद्धतीने दोन्ही गटाकडून शिवतीर्थावर दावा केला गेला त्याचप्रमाणे आता ठाण्यात दिवाळी पहाटच्या कार्यक्रम स्थळासाठी दोन्ही गटांकडून दावा झाला आहे. आम्ही आधी परवानगी मागितल्याचा दावा ठाकरे गटाने केला, तर आम्ही प्रथम महापालिका आणि पोलिसांना पत्र दिल्याचा दावा शिंदे गटाने केला. त्यामुळे आता दिवाळी पहाट कोणाची साजरी होणार, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे. दोन्ही गटांनी दोन दिवाळी पहाटचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी केले तर ठाणेकरांना दुप्पट सांस्कृतिक मेजवानी लाभेल, असे ठाणेकर म्हणत आहेत.

 दहा वर्षे युवा सेनेचे पदाधिकारी नितीन लांडगे हे कार्यक्रमाकरिता पत्र देत होते. त्यांच्या पत्रावर परवानगी दिली जात असल्याचे शिंदे गटाने सांगितले. लांडगे हे शिंदे गटात सामील झाल्याने त्यांनी यंदा १९ सप्टेंबर रोजी पालिका आणि पोलिसांकडे परवानगी मागितली व त्यांना ती देण्यात आली. शिवाय चिंतामणी चौकातील जागा देखील शिंदे गटाने मागितली. मागील १० वर्षे आमच्या संस्थेच्या माध्यमातून ठाण्यात दिवाळी पहाट साजरी केली जात असल्याने आम्ही परवानगी मागितली होती. पालिकेने आम्हाला देखील त्याच ठिकाणी परवानगी दिली असल्याचा दावा ठाकरे गटाने केला. शिंदे गटाकडून उशिरा पत्र देण्यात आले असून मागची तारीख टाकण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. 

दरम्यान, ठाकरे गटाने डॉ. मुस रोडसाठी परवानगी मागितली नसल्याचा दावा शिंदे गटाने केला. गडकरी रंगायतन येथे दिवाळी पहाट साजरी करण्याची परवानगी ठाकरे गटाने मागितली असल्याचे बोलले जाते; मात्र मागील १० वर्षे आम्ही ज्याठिकाणी दिवाळी पहाट साजरी करीत आहोत, त्याच ठिकाणी यंदाही पहाट साजरी केली जाणार असल्याचे ठाकरे गटाने स्पष्ट केले.

युवा सेनेच्या माध्यमातून मागील १० वर्षे मी पत्रव्यवहार करीत आलो असून त्याच माध्यमातून यंदा एक महिना आधीच परवानगी मागितली. पालिका, पोलिसांनी परवानगी दिली. आम्ही पत्रावर आधीची तारीख टाकलेली नाही, खोटेनाटे आरोप केले जात आहेत. - नितीन लांडगे, विस्तारक, युवासेना

मागील १० वर्षे आमच्या संस्थेच्या माध्यमातून डॉ. मुस रोडवर दिवाळी पहाट साजरी केली जात आहे. शिंदे गटाने त्याच ठिकाणची परवानगी मागितली आहे. आम्हाला पालिका, अग्निशमन दल, पोलिसांनी परवानगी दिली आहे. एकीकडे सण जल्लोषात साजरे करा, असे सांगितले जात आहे; मात्र सणांना गालबोट लावण्याचे आणि सण साजरे करू नये यासाठी त्यांच्याकडून काम सुरू आहे. - राजन विचारे, खासदार, ठाणे

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: now for diwali program shinde thackeray group face to face who will get the ground let there be two events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.