आता चंद्रपुरातही फॉरेन्सिक लॅब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2016 04:16 AM2016-10-08T04:16:03+5:302016-10-08T04:16:03+5:30
जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासासाठी आवश्यक वैज्ञानिक परीक्षण नागपूर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) करावे लागायचे.
चंद्रपूर : जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासासाठी आवश्यक वैज्ञानिक परीक्षण नागपूर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) करावे लागायचे. मात्र आता दारूबंदी विभागाने चंद्रपूर येथे प्रादेशिक न्यायसहायक प्रयोगशाळा स्थापन केली असून, त्याच्या इमारतीचे उद्घाटन शुक्रवारी पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्या हस्ते झाले.
जिल्ह्यात गेल्या वर्षी दारूबंदी लागू करण्यात आली आहे. तेव्हापासून अवैध दारूविक्रीचे प्रमाण वाढले आहे. पोलीस दररोज छापे टाकून लाखो रुपये किमतीची अवैध दारू जप्त करीत आहेत. जिल्ह्यात नोंदविले जाणारे सर्वाधिक गुन्हेदेखील अवैध दारूविक्रीचेच आहेत. या छाप्यांमध्ये जप्त साहित्य परीक्षणासाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठवावे लागत होते. तेथून त्याचा अहवाल प्राप्त होईपर्यंत चंद्रपूर पोलिसांना वाट पाहावी लागत होती. मात्र आता ही प्रयोगशाळा सुरू होत असल्याने पोलिसांना प्रतीक्षा करावी लागणार नाही. (प्रतिनिधी)