आता सोलापुरात होणार फॉरेन्सिक लॅब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:16 PM2019-07-02T12:16:08+5:302019-07-02T12:19:28+5:30
पुणेवारी थांबणार; मुख्यालयाच्या जुन्या इमारतीत दिली जागा
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या ठिकाणी मिळणाºया वस्तू आणि नमुन्यांचे विश्लेषण व्हावे, यासाठी जिल्ह्यात स्वतंत्र लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेला (फॉरेन्सिक लॅब) मंजुरी मिळाली आहे. राज्य शासनाच्या निधीतून सुसज्ज अशी लॅब उभारण्यात येणार असून, यामुळे जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळणार आहे. लॅबसाठी पोलीस मुख्यालयाच्या जुन्या इमारतीत जागा देण्यात आली आहे.
शहर व जिल्ह्यातील घडणाºया गुन्ह्यांच्या ठिकाणी सापडणाºया विविध वस्तू, नमुने आणि अन्य साहित्यांचा पुराव्यासाठी उपयोग केला जातो. जप्त केलेल्या या वस्तू फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवून त्याचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण केले जाते, त्याचा अहवाल तयार करून तपास यंत्रणांना देण्यात येतो. तपासात या प्रयोगशाळेची महत्त्वाची भूमिका असते. मुंबई येथे लॅबचे मुख्यालय असून महाराष्ट्रात नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नांदेड व कोल्हापूर या आठ ठिकाणी प्रादेशिक न्यायसहायक प्रयोगशाळा आहेत. राज्यात नव्या पाच प्रयोगशाळा निर्माण करून त्यांना अद्ययावत यंत्रणा देण्याचा प्रस्ताव गृहविभागाकडून तयार करण्यात आला होता.
सोलापूरमध्ये अशी प्रयोगशाळा तयार होणार आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयातील जुन्या इमारतीत ही फॉरेन्सिक लॅब उभारण्यात येणार आहे. शहर व जिल्ह्यात झालेल्या गुन्ह्यांतील वस्तू विश्लेषणासाठी पुणे येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येत होते. पोलिसांना लॅबच्या अहवालाची वाट पाहावी लागत होती. ही लॅब आता सोलापुरातच होत असल्याने शहर व जिल्ह्यातील पोलिसांना सोयीचे ठरणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यालाही होऊ शकतो फायदा : बापू बांगर
- फॉरेन्सिक लॅबसाठी मुख्यालयातील जुनी इमारत देण्यात आली आहे. लॅबसाठी आवश्यक असलेले कर्मचारी व अधिकारी गृहविभागाकडून नियुक्त केले जातात. पीडब्ल्यूडी विभागाकडून इमारतीचे नूतनीकरण होईल आणि फॉरेन्सिक लॅब उभारली जाईल. शहर व जिल्ह्यासह शेजारी असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यालाही फायदा होऊ शकतो, अशी माहिती प्रभारी आयुक्त बापू बांगर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.