आता मोबाईलवर भरा मिळकत कर, पाणीपट्टी

By admin | Published: January 21, 2016 01:29 AM2016-01-21T01:29:31+5:302016-01-21T01:29:31+5:30

शहरातील मिळकतधारकांना आता आपल्या स्मार्ट फोनवरूनही मिळकतकर तसेच पाणीपट्टी भरता येणार आहे. महापालिकेच्या ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत पालिकेकडून

Now get tax on the mobile, waterpot | आता मोबाईलवर भरा मिळकत कर, पाणीपट्टी

आता मोबाईलवर भरा मिळकत कर, पाणीपट्टी

Next

पुणे : शहरातील मिळकतधारकांना आता आपल्या स्मार्ट फोनवरूनही मिळकतकर तसेच पाणीपट्टी भरता येणार आहे. महापालिकेच्या ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत पालिकेकडून ही सुविधा नागरिकांना देण्यासाठी स्वतंत्र मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ही सुविधा येत्या प्रजासत्ताक दिनापासून सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या मान्यता मिळविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून सर्व स्तरांवर काम सुरू असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. अशा प्रकारे मोबाईल अ‍ॅपवर पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करून देणारी पुणे ही महाराष्ट्रातील पहिली महापालिका ठरणार आहे. यापूर्वी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन संगणकाच्या माध्यमातून ही बिले नागरिकांना भरण्याची सुविधा देण्यात आलेली होती.
शहराचा स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास सुरू असतानाच, नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग महापालिकेच्या विविध विभागांच्या माहितीसाठी तसेच त्यांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या जास्तीत जास्त सुविधा आॅनलाइन पद्धतीने देण्यासाठी पालिकेकडून विविध अ‍ॅप्स विकसित केली जात आहेत.
शहरात तब्बल साडेसात लाख मिळकती असून, त्यातील जवळपास एक ते दीड लाख मिळकतधारक आॅनलाइन पद्धतीने कर भरतात. ही संख्या वाढत असल्याने तसेच जास्तीत जास्त नागरिक स्मार्टफोन वापरत असल्याने आता पालिकेकडून हा मिळकतकर मोबाईल अ‍ॅप्सवर भरण्यासाठी आॅनलाइन गेट वे प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यासाठीचे अ‍ॅप्स तयार असून, त्याची प्राथमिक चाचणीही झाली आहे. मात्र, त्यासाठी काही मान्यतांची आवश्यकता असल्याने ही मान्यता मिळविण्याचे काम सुरू असून, येत्या प्रजासत्ताक दिनी ही सुविधा आरंभ करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
या अ‍ॅप्सवर महापालिकेच्या जवळपास १५ विभागांची माहितीही असणार असून, नागरिकांना वेगवेगळ्या विषयासंदर्भात तक्रारी करता याव्यात, यासाठीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Now get tax on the mobile, waterpot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.