...आता तरी द्या दररोज पाणी

By admin | Published: August 4, 2016 12:50 AM2016-08-04T00:50:28+5:302016-08-04T00:50:28+5:30

शहराला रोज पाणीपुरवठा करण्यात यावा, असा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी मंजूर करण्यात आला.

... Now give it every day to water | ...आता तरी द्या दररोज पाणी

...आता तरी द्या दररोज पाणी

Next


पुणे : पुणेकरांचा अजून अंत पाहू नका, सर्व धरणांमध्ये आता समाधानकारक पाणीसाठा आहे, त्यामुळे शहराला रोज पाणीपुरवठा करण्यात यावा, असा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी मंजूर करण्यात आला. आयुक्तांच्या माध्यमातून हा ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यांचा निर्णय काय होतो यावरच या ठरावाची अंमलबजावणी अवलंबून आहे.
धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक नाही, असे कारण देत रोज पाणी देण्याला साधारण पंधरा दिवसांपूर्वी विरोध करणाऱ्या भारतीय जनता पक्ष, काँग्रेस यांचीही आता पाणी रोज देण्याला संमती होती. मात्र, तरीही यावरून सर्वसाधारण सभेत राजकीय चर्चेने रंग धरला. त्याचा निषेध करीत अखेरीस काँग्रेसने सभात्याग केला. सभेच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांनी रोज पाणी देण्यासाठी आंदोलन सुरू केले. त्यांच्या सदस्यांनी पाण्यावर बोलताना पालकमंत्री गिरीश बापट यांना लक्ष्य केले. त्यावरून भाजपचे गटनेते गणेश बीडकर व त्यांची चकमक
उडाली. राष्ट्रवादीच्या सुभाष
जगताप यांच्याबरोबर तर त्यांचे वाद झाले.
मनसेच्या राजेंद्र वागसकर, बाळा शेडगे, रूपाली पाटील, अस्मिता शिंदे, सुशीला नेटके, पुष्पा कनोजिया, आदींनी पालकमंत्री बापट पाण्याच्या विषयात राजकारण आणत असल्याची टीका केली. वर्षभर दिवसाआड पाणी सहन करणाऱ्या पुणेकरांना आता पाणी असतानाही ते द्यावे असे बापट यांना वाटत नसल्याचा आरोप त्यांनी केला. हातातील फलक उंचावून त्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. महापौरांनाही त्यांनी जबाबदार धरले. भाजपचे धनंजय जाधव, सेनेचे सचिन भगत, राष्ट्रवादीच्या नंदा लोणकर, काँग्रेसच्या कमल व्यवहारे, सुनंदा गडाळे यांनीही चर्चेत भाग घेतला.
राष्ट्रवादीच्या बंडू केमसे यांनी ‘महापौरांना काय विचारता, बापट यांनाच जाब विचारा’ असे सांगत मनसेच्या सदस्यांना डिवचले. बीडकर यांनी त्याला हरकत घेतली. त्यावर राष्ट्रवादीच्या सुभाष जगताप व त्यांची वादावादी झाली. अखेरीस महापौरांनी चर्चेत हस्तक्षेप केला.
‘धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक असल्याने आता पुणेकरांना रोज पाणी द्यावे’ अशी मागणी करणारा सर्वसाधारण सभेचा ठराव आयुक्तांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या ठरावानुसार जिल्हाधिकारी निर्णय घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
।नदीपात्रातील वसाहतीकडे दुर्लक्ष
भाजपच्या मंजूषा नागपुरे, मनसेचे राजाभाऊ लायगुडे, युगंधरा चाकणकर यांनी नदीपात्रातील वसाहतींमध्ये पुराचे पाणी शिरले असूनही पालिका त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याची टीका केली. नागपुरे यांनी एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने तिथे अद्याप भेट दिली नसल्याचे सांगितले. महापौरांनी त्यावर सर्वसाधारण सभा संपल्यानंतर आयुक्तांसह आपण स्वत:ही लगेचच तिथे जाणार असल्याची माहिती दिली.
>महापौरांना सर्वसाधारण सभा हँडल करता येत नाही, असा आरोप काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केला. पाण्यासारख्या विषयावर नगरसेवक राजकीय स्वार्थ पाहत आहेत, अशी टीका करीत शिंदे यांनी काँग्रेसच्या सर्व सदस्यांसह सभात्याग केला. धरणात आता पाणीसाठा चांगला असल्याने रोज पाणी सोडण्यास काँग्रेसची हरकत नाही, असे त्यांनी सांगितले.
>राष्ट्रवादीच्या दीपक मानकर यांनी हा विषय राजकीय स्वार्थ पाहण्याचा नाही असे सांगत स्वपक्षीय सदस्यांवरही टीका केली. सर्वपक्षीय सदस्यांनी एकत्रितपणे जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पुणेकरांना आता रोज पाणी दिलेच पाहिजे, अशी मागणी करण्याचे सुचविले.

Web Title: ... Now give it every day to water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.