देवानंच आता मला लढण्याची ताकद द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 03:52 AM2017-07-18T03:52:40+5:302017-07-18T03:52:40+5:30

‘कॅन्सर सोडून सगळ्या आजारांनी मला घेरलं आहे. पेसमेकर बसवलाय...त्याचे पुन्हा आॅपरेशन करायचंय... गुडघे व सांधेदुखीने त्रस्त झालोय, पोटदुखीचा त्रास साथ

Now God should give me strength to fight | देवानंच आता मला लढण्याची ताकद द्यावी

देवानंच आता मला लढण्याची ताकद द्यावी

googlenewsNext

- अतुल कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘कॅन्सर सोडून सगळ्या आजारांनी मला घेरलं आहे. पेसमेकर बसवलाय...त्याचे पुन्हा आॅपरेशन करायचंय... गुडघे व सांधेदुखीने त्रस्त झालोय, पोटदुखीचा त्रास साथ सोडायला तयार नाही... डोळ्यांनी नीट दिसत नाही... तुम्ही नाव घ्याल ते दुखणे सध्या आहे. माझे निर्दोषत्व सिध्द करण्यासाठी मी तुरुंगातून बाहेर आल्यावर मला परमेश्वराने काही वेळ द्यावा’ अशी अगतिकता माजी उपमुख्यमंत्री आ. छगन भुजबळ यांच्या तोंडून ऐकताना राष्ट्रवादीचे नेते अक्षरश: नि:शब्द झाले.
महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा आणि बेनामी संपत्तीच्या आरोपाखाली आॅर्थर रोड कारागृहात असलेले भुजबळ राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी सोमवारी विधानभवनात आले होते. कधीकाळी ‘आर्मस्ट्राँग’ म्हणून परिचित असलेल्या भुजबळांची वाढलेली दाढी, थकलेले शरीर, चेहऱ्यावर काळजीच्या सुरकुत्या अशी शरपंजरी अवस्था पाहून अनेकांना गलबलून आले. पण सारेच नि:शब्द होते.
चारचौघांच्या आधाराने रुग्णवाहिकेतून उतरलेल्या भुजबळांना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि आ. जयंत पाटील यांनी हाताला धरून विधानभवनात आणले. सोबत सुनील तटकरे आणि जितेंद्र आव्हाडही होते. विधानभवनाच्या पायऱ्या चढून ते लिफ्टजवळ आले. पण धाप लागली म्हणून पहिल्या मजल्यावर असलेल्या सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात त्यांना नेण्यात आले. तेथे पाणी पितानाही त्यांना बराचवेळ लागला. भुजबळांच्या हातात मानेला लावयचा पट्टा आणि अंगावर यावेळी साधी शाल होती.
भुजबळांना त्रास होतोय ही वार्ता मिळताच दिलीप वळसे-पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या आमदारांनीही तेथे गर्दी केली. भाजपाचे आ. राम कदम यांनीही त्यांची विचारपूस केली. तब्यतेविषयी विचारता ‘बरा आहे’ एवढाच शब्द त्यांच्या तोंडून निघे. मतदान करून परतल्यानंतर कोणीतरी अर्धी पोळी-भाजी प्लेटमध्ये त्यांना दिली. तेव्हा स्वत:जवळच्या पिशवीतून त्यांनी एक छोटा रुमाल, एक पेपर नॅपकीन आणि छोटी हॅन्ड सॅनेटायझरची बाटली काढली. दोन थेंब हातावर घेतले आणि हात पुसून अर्धी पोळी खाल्ली. आणि वरून औषधं घेतली. त्यानंतर मुंडे, जयंत पाटील यांचा हात धरुन ते अ‍ॅम्ब्युलन्सकडे रवाना झाले. तेव्हा जमलेले कार्यकर्ते ‘भुजबळ साहेब आगे बढो’ च्या घोषणा देत होते आणि इकडे सगळे नेते खिन्न चेहऱ्याने विधानभवनात परत फिरले होते...

भुजबळ गलितगात्र!
विधानभवनातील
मतदानाचे सोपस्कार
आटोपून ते कारागृहाच्या परतीवर निघाले. मध्येच पत्रकारांनी गाठले. एरव्ही राजकीय कोट्या करणारे, हास्यविनोदात रमणारे... आणि परखड प्रतिक्रिया देणारे भुजबळ कमालीचे गलितगात्र दिसत होते. ‘आता लढण्यासाठी देवाने बळ द्यावे एवढीच प्रार्थना करतो आहे’ असे बोलून ते निघाले.

- विधानभवनाच्या पोर्चपर्यंत पोहोचेपर्यंत पावसात भिजत भिजत अजित पवार आले. दोघांची पोर्चमध्ये भेट झाली. काही क्षण दोघे एकमेकांकडे नुसते पाहात उभे राहिले. अजितदादांनी हात जोडून नमस्कार केला आणि दोघांमध्ये काही वेळ उभ्या उभ्याच बोलणे झाले.

Web Title: Now God should give me strength to fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.