आता सरकार सर्वांना ‘आनंदी’ ठेवणार! लवकरच नवीन मंत्रालयाची स्थापना : चंद्रकांत पाटील यांच्यावर जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 03:17 AM2018-02-26T03:17:23+5:302018-02-26T06:48:32+5:30
नापिकी, बोंडअळी अन् गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे त्रासलेले शेतकरी, नोक-या मिळत नसल्याने वैतागलेले बेरोजगार, जीएसटीच्या त्रासामुळे संतापलेले व्यापारी आणि भाववाढीत भरडली जात असलेली सर्वसामान्य जनता या सर्व समाजघटकांना सदोदित ‘आनंदी’ ठेवण्याचा निर्णय
समीर देशपांडे
कोल्हापूर : नापिकी, बोंडअळी अन् गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे त्रासलेले शेतकरी, नोक-या मिळत नसल्याने वैतागलेले बेरोजगार, जीएसटीच्या त्रासामुळे संतापलेले व्यापारी आणि भाववाढीत भरडली जात असलेली सर्वसामान्य जनता या सर्व समाजघटकांना सदोदित ‘आनंदी’ ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नागरिकांना आनंदी ठेवण्यासाठी लवकरच नवे मंत्रालय सुरू होत असून याची जबाबदारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपवण्यात येणार आहे.
जगभरामध्ये ‘आनंदाचा निर्देशांक’ ही संकल्पना आता महत्त्वाची मानली जात आहे. एखाद्या देशातील, राज्यातील नागरिक किती आनंदी आहेत यावर हा निर्देशांक काढला जातो. गतवर्षीच्या जागतिक अहवालामध्ये नॉर्वे हा देश यामध्ये पहिल्या क्रमांकावर असून भारत १२२ व्या क्रमांकावर आहे. मध्य प्रदेशमध्ये अशाप्रकारे नागरिकांना आनंदी ठेवण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात आले असून याच धर्तीवर महाराष्ट्रातही असे मंत्रालय सुरू करण्यात येणार आहे.
सध्या नवीन मंत्रालयाचे कच्चे प्रारूप तयार करण्यात आले आहे. या मंत्रालयासाठी लागणारा निधी, आवश्यक अधिकारी-कर्मचारी वर्ग ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम रूप देण्यात येईल.
सामान्याला आनंद देणा-या बाबी करू-
जगण्याच्या संघर्षामध्ये अनेक छोटे-मोठे आनंद घेण्यापासून नागरिक हिरावले जातात. तोच आनंद त्यांना मिळवून देण्यासाठी या विषयासाठी वाहिलेले नवीन मंत्रालय स्थापन करण्यात येणार आहे. मदत आणि पुनर्वसनांतर्गतच ते राहणार असल्याने त्याचा कार्यभारही माझ्याकडे असेल. सामान्याला आनंद देणा-या अनेक बाबी आम्ही या माध्यमातून करू, असे महसूल, मदत पुनवर्सनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.