आता तुरुंगांमध्ये व्यायामशाळा
By admin | Published: May 11, 2016 03:46 AM2016-05-11T03:46:26+5:302016-05-11T03:46:26+5:30
राज्यातील तुरुंगांमध्ये व्यायामशाळा सुरू करण्यासंबधीचा प्रस्ताव तुरुंगाचे अधिकारी लवकरच सादर करणार आहेत. तुरुंगातील कच्च्या कैद्यांची काहीही शारीरिक हालचाल/व्यायाम होत नसल्यामुळे
डिप्पी वांकाणी, मुंबई
राज्यातील तुरुंगांमध्ये व्यायामशाळा सुरू करण्यासंबधीचा प्रस्ताव तुरुंगाचे अधिकारी लवकरच सादर करणार आहेत. तुरुंगातील कच्च्या कैद्यांची काहीही शारीरिक हालचाल/व्यायाम होत नसल्यामुळे त्यांना जीवनशैलीचे आजार होण्याचा धोका आहे. त्यामुळे व्यायामशाळांचा प्रस्ताव असल्याचे गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. शिक्षा झालेल्यांना ती भोगून होईपर्यंत त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार व्यायाम करणे सक्तीचे आहे. आज तुरुंगांतील एकूण कैद्यांपैकी ७० टक्के कच्चे कैदी आहेत. आता त्यांना तुरुंगांच्या आवारात झाडे लावावी लागतील.
कच्च्या कैद्यांची तुरुंगात कोणतीही शारीरिक हालचाल होत नसल्यामुळे त्यांना वेगवेगळे आजार होण्याचा धोका असतो. त्यांच्याकडे बराच मोकळा वेळ असतो. त्यामुळे तुरुंगांत त्यांना व्यायाम करता येईल, यासाठी व्यायामशाळा सुरू कराव्यात, असा आमचा विचार असल्याचे तुरुंगांची जबाबदारी असलेले प्रधान सचिव (गृह) सतबीर सिंग (भारतीय प्रशासन सेवा-आयएएस) यांनी सांगितले. या व्यायामशाळेतील उपकरणांविषयी सिंग म्हणाले की, ‘व्यायामांची बरीच साधने एकाच जागी घट्ट बसविलेली असतील. कैदी मारामाऱ्यांत त्यांचा वापर करू शकणार नाहीत. डंबेल्ससारखी साधने त्यांना दिली जाणार नाहीत.’
कच्च्या कैद्यांकडून तुरुंगाच्या आवारात झाडे लावण्यासाठीचा सरकारी ठराव (जीआर) लवकरच संमत केला जाईल. ज्या तुरुंगांत पुरेशी जागा उपलब्ध आहे, तेथेच झाडे लावली जातील, असे त्यांनी सांगितले. व्यायामशाळा आणि वृक्षारोपणाशिवाय कच्च्या कैद्यांसाठी पुस्तके असलेले ग्रंथालय आणि बागकाम, चित्रकला, संगीत आदी उपक्रम सुरू केले जातील. त्यांच्यासाठी प्रेरणादायी आणि धार्मिक पुस्तके या ग्रंथालयात ठेवली जातील. चित्रे काढण्यासाठी आवश्यक ते साहित्य पुरविले जाईल, असे सिंग म्हणाले. डब्ल्यूएचओने केलेल्या व्याख्येप्रमाणे कच्चे कैदी हे आध्यात्मिक, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असले पाहिजेत. या तिन्ही अंगांनी कच्चे कैदी उत्तम आरोग्याचे असले पाहिजेत, असे आमचे प्रयत्न असतील, असे त्यांनी सांगितले. व्यायामशाळेचा विचार सध्या अमूर्त रूपात आहे. त्याचा तपशील लवकरच पूर्ण होईल, असे सिंग म्हणाले.