आता राज्यातील ग्रामपंचायत उपसरपंचांनाही आता मानधन, राज्य सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 06:45 PM2020-06-17T18:45:56+5:302020-06-17T18:46:43+5:30

राज्यात सुमारे २८ हजार ग्रामपंचायती असून त्यातील ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केलेल्या २४ हजार ४८५ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांच्या खात्यावर सध्या मानधन जमा झाले आहे.

Now the honorarium to the Gram Panchayat Upsarpanch in the state, the decision of the state government | आता राज्यातील ग्रामपंचायत उपसरपंचांनाही आता मानधन, राज्य सरकारचा निर्णय

आता राज्यातील ग्रामपंचायत उपसरपंचांनाही आता मानधन, राज्य सरकारचा निर्णय

Next

मुंबई - राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांबरोबर आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन देण्यात येत आहे. आतापर्यंत फक्त सरपंचांना मानधन देण्यात येत होते, त्यात उपसरपंचांचा समावेश नव्हता. पण आता सरपंचांप्रमाणे उपसरपंचांनाही मानधन सुरु करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात १५.७२ कोटी रुपयांची रक्कम उपसरपंचांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली.

याबाबत माहिती देताना  मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील गावांच्या विकासासाठी सरपंचांबरोबर उपसरपंचांचेही मोठे योगदान असते. सध्या राज्यातील सरपंचांना दरमहा मानधन मिळत आहे. पण गावाच्या विकासासाठी असलेले उपसरपंचांचे योगदान लक्षात घेऊन त्यांनाही मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु काही तांत्रिक कारणास्तव आतापर्यंत त्यांना मानधन अदा करण्यात आले नव्हते. आता यासंदर्भातील लेखाशिर्ष तयार करणे, मानधन ऑनलाईन अदा करण्याची कार्यप्रणाली तयार करणे आदी सर्व प्रक्रिया पार पाडून एकूण ८ महिन्यांचे एकत्रित मानधन उपसरपंचांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. एकुण १५.७२ कोटी रुपये खात्यावर जमा करण्यात आले आहेत, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

राज्यात सुमारे २८ हजार ग्रामपंचायती असून त्यातील ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केलेल्या २४ हजार ४८५ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांच्या खात्यावर सध्या मानधन जमा झाले आहे. उर्वरित उपसरपंचांच्या खात्यावर मानधन जमा करण्याची कार्यवाही सुरु असून ती लवकरच पूर्ण केली जाईल, अशी माहिती मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली. 

२००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा १००० रुपये तर २००१ ते ८००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा १५०० रुपये आणि ८००१ पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा २००० रुपये इतके मानधन देण्यात येत आहे.

सरपंचांनाही मिळाले प्रलंबित मानधन

दरम्यान, राज्यातील सरपंचांचे काही महिन्यांचे मानधन प्रलंबित राहीले होते. हे मानधन तातडीने अदा करण्यात यावे, अशा सूचना विभागास दिल्या होत्या. त्यानुसार कार्यवाही करुन विभागामार्फत प्रलंबित मानधनापोटी सरपंचांच्या खात्यावर नुकतेच २२ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत, अशी माहितीही मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

Web Title: Now the honorarium to the Gram Panchayat Upsarpanch in the state, the decision of the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.