आता ‘डाव’ खरे होणार नाहीत!

By admin | Published: April 27, 2016 03:37 AM2016-04-27T03:37:27+5:302016-04-27T03:37:27+5:30

ज्यांचे ‘डाव’ आजवर ‘खरे’ ठरले ते मातोश्रींच्या आशीर्वादानेच ठरले.

Now 'innings' will not be true! | आता ‘डाव’ खरे होणार नाहीत!

आता ‘डाव’ खरे होणार नाहीत!

Next

ठाणे : ज्यांचे ‘डाव’ आजवर ‘खरे’ ठरले ते मातोश्रींच्या आशीर्वादानेच ठरले. त्यामुळे डावखरेसाहेब तुम्ही कितीही डाव आखलेत, तरी तुमचे ‘डाव’ आता ‘खरे’ होणार नाहीत, असा थेट टोला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी ठाण्यात लगावला. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे पुन्हा रिंगणात आहेत आणि शिवसेनेच्या पाठबळासाठी प्रयत्नशील आहेत, त्या पार्श्वभूमीवर कदम यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जाते.
संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अभिष्टचिंतनासाठी सोमवारी डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात रंगतदार सोहळा झाला. त्याला पर्यावरणमंत्री रामदारस कदम, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, राज्यमंत्री दादा भुसे, जलसंपदा मंत्री विजय शिवतरे, ठाण्याचे महापौर संजय मोरे, मीरा भाईंदरच्या महापौर गीता जैन, मीरा-भाईंदरचे आयुक्त अच्युत हांगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्याद्वारे सरनाईक यांनी एकप्रकारे राजकीय शक्तीप्रदर्शन केल्याचे जाणवत होते.
या सोहळ््यात कदम बोलत होते. ठाण्यातील शिवसेनेअंतर्गत सुप्त संघर्ष पुरेपूर ठावूक असल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळत त्यांनी निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्रात कोणी यशस्वीपणे पूर्ण केली असेल, तर ती एकनाथ शिंदे यांनी, अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले. हे काम ‘दाढीवाले’च करु शकतात, असे त्यांनी मिश्किलपणे म्हणताच प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला आणि व्यासपीठावरील मान्यवरांनाही हसू आवरले नाही.
तत्पूर्वी शिंदे यांचा उल्लेख करत आम्ही दोघांनी एकमेकांच्या हातात घातलेला हात कधीही सुटणार नाही. कारण मैत्रीचा धागा हा अतूट असतो, अशा भावना विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी व्यक्त केल्या. आमदार सरनाईक हे आमच्याकडूनच राजकारणात आले आहेत. दिवाकर रावते असो, एकनाथ शिंदे असो हे सर्वच माझे मार्गदर्शक आहेत. सर्वांनीच मला प्रेम दिले आहे असे सांगत त्यांनी सरनाईक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, सरनाईक यांनी आपल्या आमदार निधीतून ठाणे व मीरा-भाईंदरसाठी दिलेल्या दोन अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा या वेळी पार पडला. त्यांच्या जीवनप्रवासावर आधारीत ‘१८ एस कृष्णकुंज’चे प्रदर्शन झाले. या रुग्णवाहिकांचा फायदा दोन्ही शहरांना होईल, अशी भावना सरनाईक यांनी व्यक्त केली.
ठाणे शहर जसे विकसित झाले, तसेच काम मीरा-भाईंदरमध्येही केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ठाण्याप्रमाणे मीरा-भाईंदरमध्येही रस्ता रुंदीकरण केले जाणार असून हे शहर अतिक्रमणमुक्त केले जाणार आहे. तसेच तेथे चांगल्या सुविधा दिल्या जातील. वाढदिवसानिमित्त होर्डिगची व पुष्पगुच्छाची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कन्यादान योजनेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे लवकरच सुपूर्द केली जाणार असल्याचे त्यांच्यातर्फे जाहीर करण्यात आले.
(प्रतिनिधी)
सरनाईक यांचे कौतुक
आमदार सरनाईक यांचे कौतुक करत पालकमंत्री शिंदे यांनी, आमदार अनेक असतात परंतु आपल्या मतदारसंघात लोकांना काय हवे याचे अचूक ज्ञान-त्याची माहिती सरनाईक यांना नेहमीच असते, अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले. मेट्रो ठाण्यात आल्याशिवाय राहणार नाही, अशी खात्रीही शिंदे यांनी सरनाईक यांना दिली.
मैत्री राजकारणापलिकडची
शहरातील लोकसंख्या वाढते आहे. त्यानुसार पाण्याची गरजही वाढत आहे. ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र धरण आवश्यक आहे. स्त्रोत आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. वसंत डावखरे यांच्यासोबतची मैत्री राजकारणापलिकडील असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

Web Title: Now 'innings' will not be true!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.