सिंचन समृद्धीसाठी राज्यात आता ‘जलनायक’, देशातील पहिलाच प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 06:55 PM2017-11-03T18:55:19+5:302017-11-03T18:55:31+5:30
राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर वगळता उर्वरित ३४ जिल्ह्यांमध्ये पाणीबचतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच सिंचन समृद्धीसाठी जलनायकांची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
संदीप मानकर
अमरावती : राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर वगळता उर्वरित ३४ जिल्ह्यांमध्ये पाणीबचतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच सिंचन समृद्धीसाठी जलनायकांची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यशदा (पुणे), वाल्मी (औरंगाबाद), डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय आणि विकास प्रबोधनी (अमरावती) आणि वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधनी (चंद्रपूर) यांना विभागीय पातळीवरील जलसाक्षरता केंद्रांच्या नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या उपक्रमामध्ये विविध स्तरांवर प्रशिक्षण देण्याचा व जलक्षेत्रातील कामाचा अनुभव असणा-या प्रशिक्षकांना जलनायक असे संबोधण्यात येते. त्यांची संख्या राज्यस्तरावर ३४ , विभागस्तरावर प्रत्येकी ८ असे ४८, जिल्हास्तरावर प्रत्येकी १० असे ३४०, तालुकास्तरावर १२ असे २६८ तालुक्यांत ३२२४ अशी राहणार आहे.
जिल्हा समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जलदूत, जलप्रेमी व जलकर्मी यांचीही निवड करण्यात येईल. संख्येत आवश्यकतेनुसार बदल करणे, विविध स्तरांवरील जलनायकांची कार्यकक्षा निश्चित करणे, त्यांच्या निवडीचे निकष, निवडीची कार्यवाही जलसाक्षरता केंद्रांमार्फत करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय जलसाक्षरता समन्वय समितीचे अध्यक्ष जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आहेत. यशदा स्तरावरील जलसाक्षरता समितीचे अध्यक्ष उपमहासंचालक (यशदा), जिल्हास्तरावरील समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, तर तालुका समितीचे अध्यक्ष तहसीलदार राहणार आहेत.
जिल्ह्यात १४० पदांसाठी निवड
अमरावती जिल्ह्यात ऊर्ध्व वर्धा पाटबंधारे विभाग जलनायकांची निवड करणार आहे. जलसाक्षरता केंद्र यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणेमार्फत जलकर्मी (सेवेतील तांत्रिक अधिकारी), जिल्हा आणि तालुकास्तरीय जलनायकांची निवड करण्याचे अनुषंगाने जलनायक जलप्रेमी (जिल्हास्तर) एकूण १० पदे व जलनायक जलदूत (तालुकास्तर) प्रत्येकी १० प्रमाणे या पदांकरिता कुठलेही मानधन न घेता स्वयंस्फूर्तीने काम करण्यास इच्छुक असणाºया पात्र उमेदवारांकडून १ ते १५ नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत अर्ज मागविण्यात आले आहे.
शासनाचा हा महत्त्वाचा उपक्रम असून, यामध्ये लोकांना पाण्याची बचत व महत्त्व पटवून देण्यासाठी राज्यभर जलनायकांची पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- प्रमोद पोटफोडे, कार्यकारी अभियंता,
ऊर्ध्व वर्धा पाटबंधारे विभाग, अमरावती.
जलनायकांचे कार्य - ग्रामस्तरावरील जलसेवकाला मार्गदर्शन करणे. जलकर्मींना मार्गदर्शन करणे. जलजागृती करणे.