आता जावें पंढरीसी, दंडवत विठोबासी
By admin | Published: July 8, 2014 01:11 AM2014-07-08T01:11:21+5:302014-07-08T01:11:21+5:30
थंडी, ताप, पाऊस यांची तमा न बाळगता विठ्ठलाला दंडवत घालण्यासाठी पायी चालत आलेल्या वारक:यांना आता आषाढी सोहळ्याचे वेध लागले आहेत.
Next
जगन्नाथ हुक्केरी - पंढरपूर
आता जावें पंढरीसी।
दंडवत विठोबासी।।1।।
चंद्रभागेचिया तीरीं।
आम्हीं नाचों पंढरपुरीं।।2।।
जेथें संतांची दाटणी।
त्यांचे घेऊं पायवाणी।।3।।
तुका म्हणो आम्ही बळी।
जीव दिला पायां तळीं।।4।।
आषाढी सोहळ्यासाठी ऊन, वारा, थंडी, ताप, पाऊस यांची तमा न बाळगता विठ्ठलाला दंडवत घालण्यासाठी पायी चालत आलेल्या वारक:यांना आता आषाढी सोहळ्याचे वेध लागले आहेत. ज्ञानोबा, तुकोबांच्या पालख्यांमधील वारकरी पंढरी जवळ आल्याच्या आनंदात खेळत बागडत वाखरीच्या मुक्कामी विसावले असून, या पालख्या मंगळवारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत. पंढरीत चार लाख भाविकांची दाटी झाली आहे.
संतशिरोमणी ज्ञानेश्वर माउली भंडीशेगावचा मुक्काम हलवून वाखरीकडे मार्गस्थ होताच उभे आणि गोल रिंगण सोहळा करीत वाखरीच्या मुक्कामी विसावले तर जगद्गुरू संत तुकोबाराय पिराची कुरोलीतून निघून रिंगण करीत तेही वाखरीच्या पालखीतळाच्या मुक्कामी विसावले आहेत. रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाच्या साथीने टाळ-मृदंगाच्या गजरात विठुनामात तल्लीन वारकरी पंढरीत पोहोचल्यानंतर वरुणराजा पावल्याच्या आनंदात मोठय़ा उत्साहाने रिंगण सोहळ्यात सहभागी झाले होते. तुकोबा, ज्ञानोबा, सोपानकाका, निवृत्तीनाथ या सर्व पालख्या पंढरपूरसमीप आल्या, तर मुक्ताबाई, एकनाथ, गजानन महाराजांच्या पालख्या पंढरीत दाखल झाल्या आहेत.
विठ्ठलाची पददर्शन रांग ज्ञानेश्वर दर्शन मंडप, सेतू, सारडा भवन, नऊ दर्शन पत्रशेड ओलांडून गोपाळपूर पोलीस चौकीर्पयत पोहोचली असून, यामध्ये सव्वा लाख भाविक आहेत. एका भाविकाला नऊ ते साडेनऊ तासांचा कालावधी दर्शनासाठी लागत असल्याचे ज्ञानेश्वर भिसे व महादेव खिस्ते या भाविकांनी सांगितले. मुखदर्शन रांगेत अडीच ते तीन हजार भाविक असून, त्यांना अध्र्या तासात दर्शन मिळत असून, ऑनलाइनला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी सांगितले. (प्रतिनिधी)