आता, रयतेचं राज्य येणार! धनंजय मुंडेंच्या विधानामुळे 'सत्ता पे चर्चा'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 09:18 AM2019-10-26T09:18:32+5:302019-10-26T09:19:09+5:30
महाराष्ट्र विधानसभा 2019 निवडणूक निकालात काँग्रेसला 44 तर राष्ट्रवादीला 54 जागांची आघाडी मिळाली आहे
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकांद्वारे राज्याच्या राजकारणात आपले स्थान पुन्हा बळकट केले आहे. शरद पवार यांचे राजकारण संपणार, असे सांगणाऱ्यांना दणका दिला आहे. राष्ट्रवादीतील अनेकांनी पक्षाचा त्याग केला तरी नव्या पिढीच्या तरुण उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली. त्यानंतर, राज्यातील निकालाची आकडेवारी पाहिल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेबाबत तर्कवितर्क होऊ लागले. याबाबत, शरद पवार यांनी शिवसेनेसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, धनंजय मुंडेंनी आपल्या ट्विटमधून सूचक विधान केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी निवडणुकीतील निकालावर समाधान मानलं आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. या निवडणुकीत एक्झिट पोलचे आकडे फोल ठरवित काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने अनपेक्षित यश मिळविलं आहे. राज्यात सत्ता महायुतीची असली तरी महाआघाडीला चांगलच यश मिळालंय. त्यामध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. या निकालानंतर शरद पवारांनी शिवसेनेसोबत जाणार का? यावर स्पष्टीकरण दिलंय.
महाराष्ट्र विधानसभा 2019 निवडणूक निकालात काँग्रेसला 44 तर राष्ट्रवादीला 54 जागांची आघाडी मिळाली आहे. तर महायुतीत भाजपाला 105 तर शिवसेना 56 आणि मनसे 1 जागांवर विजयी झाले आहेत. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, महायुतीचं 220 पार जे सुरु होतं ते लोकांनी स्वीकारलं नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्र येऊन पुढील दिशा ठरवतील. मात्र, शिवसेनेसोबत आपण जाणार नाही, अशी स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलंय. त्यामुळे भाजपा-शिवसेना एकत्र येऊन सरकार स्थापन करेल, असाच प्राथमिक अंदाज दिसून येतोय. पण, धनंजय मुंडेंच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी चर्चेत सत्तेत येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
धनंजय मुंडेंनी विजयानंतर परळीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार घालून दर्शन घेतले. याबाबतचा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करताना, आता रयतेचं राज्य येणार असं कॅप्शन दिलंय. त्यामुळे, धनंजय मुंडेंकडून राष्ट्रवादी सत्तेत बसण्याचे संकेत देण्यात आल्याचं दिसून येतंय.
विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परळी शहरातील पुतळ्यास वंदन केले. आता रयतेचे राज्य येणार!#ChatrapatiShivajiMaharaj#paralipic.twitter.com/ygO1aZuAL1
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 25, 2019