आता शेवटचं सांगतोय, मुख्यमंत्र्यांचा डॉक्टरांना सज्जड दम
By admin | Published: March 24, 2017 01:25 PM2017-03-24T13:25:55+5:302017-03-24T14:01:00+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामूहिक रजेवर गेलेल्या डॉक्टरांना सज्जड दम भरला असून रुग्णांना मरणाच्या दारात सोडणार असाल, तर तुम्हाला माफ करणार नाही असा स्पष्ट इशारा दिला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामूहिक रजेवर गेलेल्या डॉक्टरांना सज्जड दम भरला असून 'रुग्णांना मरणाच्या दारात सोडणार असाल, तर तुम्हाला माफ करणार नाही', असा स्पष्ट इशारा दिला आहे. डॉक्टरांवर होणा-या हल्ल्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिलं. यावेळी बोलताना त्यांनी डॉक्टरांच्या या वागण्यावर संताप व्यक्त करत ताशेरे ओढले. तसंच कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
'सामान्य नागरिकांच्या पैशातून डॉक्टरांना शिक्षण मिळतं. जनतेच्या पैशातून फी दिली जाते हे विसरु नका, त्यांना मरणाच्या दारात सोडणार असाल, तर आम्ही तुम्हाला माफ करणार नाही', असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरला आहेत. 'डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला पण त्यांचं वागणं देवासारखं नाही', अशी टीका त्यांनी केली. तसंच 'डॉक्टरांना आपल्या शपथेचा विसर पडला आहे', असा टोलाही यावेळी हाणला.
'एवढी असंवेदनशीलता का आली आहे हे समजण्यापलीकडे आहे. जनतेचा संयम सुटला तर काय करणार ?', असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. 'आज शेवटची बैठक होणार असून आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. त्यांच्या हाता, पाया पडून विनंती करु. पण रुग्णाला मरणाच्या दारात सोडणार असतील तर माफ करणार नाही', असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत.
'जे मारहाण करतात त्यांच्यात आणि रुग्णांना मरणाच्या दारात सोडणा-यांमध्ये फरक काय ?', असा सवालही त्यांनी यावेळी विचारला. 'तसंच रुग्णाला वा-यावर सोडणा-या डॉक्टरावर निष्काळजीपणाचा गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये ?' अशी विचारणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 'आम्ही सगळ्या सुधारणा करण्यासाठी तयार आहोत', असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं.
'डॉक्टर संवेदनशील असतील, शपथ लक्षात असेल, तर तोडगा निघेल', असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सोबतच 'सरकार हातावर हात ठेवून बसणार नाही. गरज असलेली कायदेशीर कारवाई करण्यात येईल', असा स्पष्ट इशाराही दिला आहे.