महाविद्यालयांमध्येच मिळणार लर्निंग लायसन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 04:55 PM2018-09-08T16:55:14+5:302018-09-08T16:57:56+5:30
लर्निंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओ कार्यालयामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची झुंबड उडाल्याचे चित्र दररोज पहायला मिळते. यापार्श्वभुमीवर आता आरटीओचे अधिकारीच महाविद्यालयामध्ये येऊन विद्यार्थ्यांना लर्निंग लायसन्स देणार आहेत.
पुणे : लर्निंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओ कार्यालयामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची झुंबड उडाल्याचे चित्र दररोज पहायला मिळते. या पार्श्वभुमीवर आता आरटीओचे अधिकारीच महाविद्यालयामध्ये येऊन विद्यार्थ्यांना लर्निंग लायसन्स देणार आहेत. त्यासाठी महाविद्यालयांनी स्थानिक आरटीओ अधिकाºयांशी संपर्क साधून त्याबाबतची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबवावा असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित वाहन चालविण्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, त्याचबरोबर आरटीओमध्ये फेºया मारण्याऐवजी त्यांना महाविद्यालयातच लर्निंग लायसन्स मिळावे यासाठी परिवहन विभागाच्यावतीने पुढाकार घेऊन योजना तयार करण्यात आली आहे. परिवहन विभागाच्या या योजनेला प्रतिसाद देऊन महाविद्यालयांनी हा उपक्रम राबवावा असे परिपत्रक विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी काढले आहे.
परिवहन विभागामार्फत महाविद्यालयांमध्ये आॅनलाईन लर्निंग लायसन्स उपलब्ध करून देण्यासाठी एक धोरण निश्चित करण्यात येत आहे. महाविद्यालयांमध्ये लर्निंग लायसन्स उपलब्ध करून देताना परिवहन विभागाच्यावतीने काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. शिक्षणसंस्था मान्यताप्राप्त असावी, केवळ महाविद्यालयाच्या हजेरी पटावरील विद्यार्थ्यांनाच लर्निंग लायसन्स देण्यात यावे, महाविद्यालयांनी चाचणीची व्यवस्था महाविद्यालयने नि:शुल्क करावी, कागदपत्रांच्या पडताळणीचे काम महाविद्यालयाने करावे, महाविद्यालयात आॅनलाइन चाचणी घेण्यासाठी कॉम्प्युटर लॅब उपलब्ध असावी असे स्पष्ट करण्यात आले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षतेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी परिवहन विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये दुचाकी वाहनांचा वापर मोठया प्रमाणावर होत आहे. पंरतु या विद्यार्थ्यांना अनेकदा वाहन सुरक्षित चालविण्याची नियम, वाहतूक चिन्हे याची माहिती नसते. त्याचबरोबर त्यांच्याकडे नियमानुसार वाहनचालक लायसेन्स नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा अनेकदा धोक्यात येते. त्यामुळे अनेक महाविद्यालयीन तरूण-तरूणी अपघातग्रस्त होण्याच्या घटना घडत आहेत. या रोखण्यासाठी परिवहन विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
आरटीओवरील ताण होईल कमी
लर्निंग लायसन्स काढण्यासाठी विद्यार्थ्यांची आरटीओ कार्यालयामध्ये मोठयाप्रमाणात गर्दी होते. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना आॅनलाइन अपॉइन्मेंट मिळण्यातही अडचणी येत आहेत. यापार्श्वभुमीवर त्यांच्या महाविद्यालयातच विद्यार्थ्यांना लर्निंग लायसन्स मिळण्यास त्यांची मोठी सोय होणार आहे. विद्यार्थ्यांचा वेळ, श्रम व त्रास यामुळे वाचेल त्याचबरोबर आरटीओवरील कामाचा ताणही कमी होऊ शकणार आहे.