बिबट्याचे आता वाहनांवर हल्ले!

By admin | Published: September 19, 2016 12:37 AM2016-09-19T00:37:51+5:302016-09-19T00:37:51+5:30

ओतूर-जुन्नर मार्गावर गणपती फाट्याजवळ बिबट्याने शनिवारी रात्री वेगवेगळ्या वेळी दुचाकीवर हल्ले केले.

Now the leopard attacks the vehicles! | बिबट्याचे आता वाहनांवर हल्ले!

बिबट्याचे आता वाहनांवर हल्ले!

Next


ओतूर : ओतूर-जुन्नर मार्गावर गणपती फाट्याजवळ बिबट्याने शनिवारी रात्री वेगवेगळ्या वेळी दुचाकीवर हल्ले केले. यात अंजना शंकर शिंदे (वय ४०) व जयश्री ज्ञानेश्वर शिंदे (वय ३४, दोघी रा. उदापूर, जुन्नर), आदित्य सुनील थोरात (वय १५, रा. कोळमळा, ओतूर, जुन्नर) असे तिघे जखमी झाले असल्याची माहिती ओतूर वनक्षेत्रपाल सचिन रघतवान यांनी दिली.
शनिवारी रात्री अंजना शंकर शिंदे व जयश्री ज्ञानेश्वर शिंदे या उदापूरवरून ज्ञानेश्वर शिंदे यांच्या दुचाकीवरून कुमशेत येथे यात्रेनिमित्त दर्शनासाठी जात होते. गणपती फाट्याजवळ पांडुरंग बनकर यांच्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर हल्ला करून अंजना शिंदे व जयश्री शिंदे यांना जखमी केले. या हल्ल्यानंतर काही वेळाने त्याच ठिकाणी दुसऱ्या दुचाकीवर हल्ला करून आदित्य सुनील थोरात यासही जखमी केले. सर्व जखमींना प्रथमोपचार देऊन पुणे येथे वाय. सी. एम. रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले असल्याची माहिती ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी पराग डुंबरे यांनी दिली. (वार्ताहर)
>रांजणगावसांडसला दहशत
रांजणगावसांडस : रांजणगाव परिसरात शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले वाढले आहे. यामुळे दहशतीचे वातावरण असून, बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या भागातील ओढ्यांचे खोलीकरण न झाल्यामुळे त्यांचा वाढलेला विस्तार हा बिबट्यास लपण्यास व विश्रांतीसाठी असलेले क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे या भागात बिबट्याने अनेक दिवसांपासून तळ ठोकलेला आहे. रानातील खाद्य संपल्यामुळे मोरमळ्यातील ओढ्यानजीक वस्तीजवळ दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत आहे. याच वस्तीवरील प्रकाश रणदिवे याच्या पाळीव कुत्र्याचा फडशा बिबट्याने पाडला. बॅटरीच्या प्रकाशात बिबट्या कुत्र्याला ओढीत असल्याचे घरच्यांना दिसल्यावर लोकांचा थरकाप उडाला होता.
>या भागातही पाहणी करून वनविभागाने त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी नेतवड, माळवाडीचे सरपंच संतोष कदम यांनी केली.
सचिन रघतवान यांनी या परिसरात पाहणी करून दोन पिंजरे लावणार असल्याचे सांगितले.

Web Title: Now the leopard attacks the vehicles!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.