मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना आता स्थानिक पौष्टिक आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 06:09 AM2019-07-11T06:09:50+5:302019-07-11T06:10:13+5:30
ज्वारी, बाजरी, नाचणीच्या पदार्थांचा समावेश : तांदूळ २५ टक्क्यांनी कमी
साहेबराव नरसाळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनामध्ये स्थानिक पौष्टिक आहार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे़ त्यानुसार आता तांदळाच्या खिचडीचे प्रमाण कमी होऊन पौष्टिक असलेल्या ज्वारी, बाजरी आणि नाचणीचा समावेश केला आहे़ आॅक्टोबरपासून विद्यार्थ्यांना हा पोषक आहार मिळेल़ मुलांना ‘स्थानिक पोषक आहार’ मिळावा अशी मागणी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या पोषण परिक्रमेतून वारंवार समोर येत होती. सरकारच्या या निर्णयामुळे ही मागणी पूर्ण झाली आहे.
केंद्र व राज्य सरकारकडून शालेय पोषण योजनेतून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते़ शालेय पोषण आहारामध्ये प्रतिविद्यार्थी रोज १०० ते १५० ग्रॅम तांदूळ मंजूर करण्यात आला आहे़ भारतीय अन्न महामंडळाकडून मध्यान्ह भोजनासाठी सप्टेंबरपर्यंतचा धान्यपुरवठा मंजूर झालेला आहे़ त्यामुळे आॅक्टोबर महिन्याच्या धान्यपुरवठ्यात ज्वारी, बाजरी व नाचणीचा समावेश राहणार आहे़ मध्यान्ह भोजनातील खिचडीचे प्रमाण २५ टक्के कमी करून आता ज्वारी, बाजरी, नाचणीचे विविध पदार्थ किंवा भाकरी, असे पदार्थ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे़
बाजरीमध्ये जस्त व लोहाचे प्रमाण जास्त असते़ विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जस्त व लोहाचे प्रमाण आहारात अधिक असावे, त्यासाठी बाजरीचा समावेश मध्यान्ह भोजनात करण्यात आला आहे़ ज्वारीमध्ये पोषक तत्त्व जास्त असतात़ नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते़ मुलांच्या वाढीसाठी हे घटक आवश्यक असून, तीनही पदार्थ तंतुमय असल्यामुळे पचनास हलके आहेत़ त्यातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते़ त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे़
दुष्काळी भागात अंडी, दूध, फळे
सध्या मध्यान्ह भोजनामध्ये दुष्काळग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांना आठवड्यातून तीन दिवस अंडी, दूध, फळे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ पुढील वर्षी दुष्काळी गावांची यादी जाहीर झाल्यानंतर ज्या शाळा दुष्काळी भागात नसतील, त्या शाळांचा पूरक आहार बंद होणार आहे़
शिक्षकांनाच दळण दळावे लागणार का?
ज्वारी, बाजरी घेऊन शिक्षकांनी दळण दळावे का, असा सवाल करीत मुख्याध्यापक, शिक्षकांमधून सरकारच्या या निर्णयाला विरोध होत आहे़ मात्र, ज्वारी, बाजरी व नाचणीचे वेगवेगळे पदार्थ किंवा भाकरी देण्याच्या सूचना आहेत़ त्यामुळे शिक्षकांना दळण दळून आणण्याची वेळ येणार नाही, असे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी सांगितले़
च्ज्वारी, बाजरी या धान्यांना आतापर्यंत भरड धान्य म्हणून ओळखले जात होते़ मात्र, आता ही धान्य मूल्यवर्धित (पोषक) धान्य म्हणून ओेळखली जाणार आहेत़ शाळांमध्येही विद्यार्थ्यांना ज्वारी, बाजरी आणि नाचणीचा आहार मिळू लागल्यास ज्वारी, बाजरी, नाचणीचे क्षेत्रही वाढणार आहे़
पदार्थ बनवण्याचा निर्णय जिल्हास्तरावर
च्ज्वारी, बाजरीपासून विविध पदार्थ बनवायचे की भाकरी द्यायची, याबाबतचा निर्णय जिल्हा स्तरावर घेण्याच्या सूचना शिक्षण परिषदेने
दिल्या आहेत़