आता लोणीकर दुसऱ्या पत्नीमुळे अडचणीत!
By admin | Published: June 13, 2015 02:30 AM2015-06-13T02:30:57+5:302015-06-13T02:30:57+5:30
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे शैक्षणिक पात्रतेवरून वादाच्या भोवऱ्यात सापडले असतानाच त्यांनी दुसऱ्या पत्नीविषयीची माहिती निवडणूक
मुंबई : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे शैक्षणिक पात्रतेवरून वादाच्या भोवऱ्यात सापडले असतानाच त्यांनी दुसऱ्या पत्नीविषयीची माहिती निवडणूक आयोगापासून लपवून ठेवली असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसने आज केला.
लोणीकर यांना मंदाकिनी आणि वंदना अशा दोन पत्नी आहेत. दोघींच्या मतदार ओळखपत्रावर बबनरावांचे नाव आहे. मात्र, आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी केवळ मंदाकिनी यांचेच नाव नमूद केले. वंदना यांचा उल्लेखच नाही. दुसऱ्या पत्नीचे नाव निवडणूक आयोगापासून लपविण्याचे काय कारण, असा सवाल करत या बाबत लोणीकर यांनीच खुलासा करावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.
२२ मे रोजी लोणीकर यांनी तुळजापूरच्या मंदिरात सपत्नीक दर्शन घेतले तेव्हा वंदना या त्यांच्यासोबत होत्या, अशी माहिती सावंत यांनी दिली. काँग्रेसने केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी लोणीकर यांच्याशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.
दरम्यान, बबनराव लोणीकर यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बीएसच्या पूर्वपरीक्षेसाठी किंवा बीए परीक्षेसाठी कधीही प्रवेश घेतला नव्हता, असा खुलासा परतूर येथील लालबहादूर शास्री महाविद्यालयाने केला असल्याचे सावंत म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)