आता लम्पी जनावरांनाही करणार ‘क्वारंटाईन’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 06:23 AM2022-09-17T06:23:14+5:302022-09-17T06:23:46+5:30
लम्पीबाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
औरंगाबाद : लम्पीची साथ आटोक्यात आणण्यासाठी आता जनावरांनाही क्वारंटाईन (विलगीकरण) करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केली. जि. प.च्या प्रत्येक गटात एक क्वारंटाईन सेंटर उभारण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी त्यांची विमानतळावर भेट घेऊन यासंदर्भात मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वरील आदेश दिले. दरम्यान लम्पीबाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
पशुसंवर्धनमंत्री विखे-पाटील म्हणाले की, उपचारासाठी आवश्यक औषधांची ‘ड्रग्ज बँक’ तयार करण्यात येणार आहे. या रोगावर नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच लम्पीमुळे मृत झालेल्या जनावरांसाठी ३० हजारांपर्यंत मदत केली जाणार आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे शुक्रवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीला पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांच्यासह विविध अधिकारी अधिकारी सहभागी झाले होते.