राजकीय पक्षांच्या कोणत्याही बंदमध्ये सहभागी न होण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 05:55 PM2020-01-28T17:55:13+5:302020-01-28T18:05:14+5:30
महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचा मोठा निर्णय
मुंबई: पुकारलेला बंद यशस्वी करण्यासाठी राजकीय पक्ष कायम व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी करुन घेतात. त्यामुळे राजकीय बंद यशस्वी करण्यासाठी अनेकदा व्यापाऱ्यांवर दुकानं बंद करण्याची सक्ती केली जाते. यामुळे राजकीय पक्षांचा स्वार्थ साधला जात असला, तरी व्यापाऱ्यांचं मात्र नुकसान होतं. त्यामुळे यापुढे राजकीय पक्षांनी पुकारलेल्या कोणत्याही बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सनं घेतला आहे.
राज्यात यापुढे कोणत्याही बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचा ठराव महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सनं केला आहे. सतत होणाऱ्या बंद आणि आंदोलनांमुळे आर्थिक नुकसान होत असल्यानं व्यापारी संघटनेनं हा ठराव मांडला. त्यानुसार आगामी काळात कोणत्याही राजकीय पक्षाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला व्यापारी पाठिंबा देणार नसल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी दिली.
महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे पुण्याचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनीदेखील या ठरावाला पाठिंबा दर्शवला. मागील काही वर्षांपासून राज्यासह देशभरात बंद आणि आंदोलनाचे प्रकार वाढले आहेत. राजकीय पक्षांकडून अनेकदा व्यापाऱ्यांवर बंदमध्ये सहभागी होण्यासाठी दबाव आणला जातो. या बंदमध्ये सहभागी झाल्यास व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं. तर बंदमध्ये सहभागी न झाल्यास राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून दुकानाची तोडफोड होण्याचा धोका असतो. या सर्व गोष्टींमुळे त्रस्त झाल्यानं महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सनं यापुढे कोणत्याही बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.