आता गुरुवारपासून मंत्र्यांना गावबंदी!
By admin | Published: June 9, 2017 06:11 AM2017-06-09T06:11:32+5:302017-06-09T06:11:32+5:30
दुसऱ्या टप्प्यात गुरुवारपासून (१५ जून) सर्व मंत्र्यांना गावबंदी करण्याचा निर्णय सुकाणू समितीच्या नाशिक येथील परिषदेत घेण्यात आला
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कर्जमुक्ती आणि इतर मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी संपाच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारपासून (१५ जून) सर्व मंत्र्यांना गावबंदी करण्याचा निर्णय सुकाणू समितीच्या नाशिक येथील परिषदेत घेण्यात आला. तसेच येत्या दोन दिवसांत सरकारने सरसकट कर्जमुक्तीचा निर्णय न घेतल्यास सोमवारी (१२ जून रोजी) सर्व तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयांवर ठिय्या आंदोलन; १३ जून रोजी रेल्वे, रास्ता रोको आणि १३ जूननंतर मुंबईचे दाणापाणी बंद करण्याचा इशाराही देण्यात आला.
शेतकरी संपाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सुकाणू समितीची राज्यव्यापी परिषद गुरुवारी नाशिक येथे घेण्यात आली. या बैठकीस खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, शेकापचे आमदार जयंत पाटील, ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील, कॉ. अजित नवले, निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्यासह राज्याच्या अनेक भागातील शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
या परिषदेपूर्वी सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. कर्जमुक्तीच्या प्रश्नावर सुकाणू समितीने सरकारबरोबर चर्चेची तयारी दर्शविली असून, त्यासाठी सरकारवर दबाव वाढविण्यासाठी गुरुवारपासून मंत्र्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तीन वर्षांपूर्वी भाजपा सरकारसाठी गावोगावी जाऊन मते मागितल्याबद्दल आज पश्चात्ताप होत असल्याचे सांगून, शेतकरी संप फोडणाऱ्या गद्दाराला फार काळ पक्ष संघटनेत ठेवणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. त्यांचा रोख सदाभाऊ खोत यांच्यावर होता. तर ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील यांनी, सरकारने आम्ही सांगितल्याप्रमाणे कर्जमुक्ती दिल्यास राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, अशी हमी आपण लिहून देण्यास तयार असल्याचे सांगितले. मुंबईची रसद तोडली तर सरकार वठणीवर येईल, त्यासाठी रायगड व नाशिक जिल्ह्याने मुंबईचा पाणीपुरवठा बंद करण्याची तयारी करावी, असे आवाहन आमदार जयंत पाटील यांनी केले.
शेतकरी आंदोलन राजकीय पक्षविरहित असल्याचे जाहीर करण्यात आल्यामुळे सुकाणू समितीने आयोजित केलेल्या राज्यव्यापी परिषदेसाठी आलेले कॉँग्रेसचे आमदार भाई जगताप यांना व्यासपीठावर बसण्यास मज्जाव करण्यात आला.
>आत्महत्यांचे सत्र सुरूच
सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. भोंडवेवाडी (ता. बारामती) येथील हनुमंत पांडुरंग शिंदे (वय ४८) व सिरसाळा (जि. बीड) भगवान बाबूराव पौळ (६५, रा. पौळपिंपरी) या शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. सलग तिसऱ्या आत्महत्येने बारामती तालुका पुन्हा एकदा हादरला आहे. तर कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या भोयगाव (चंद्रपूर) येथील महादेव कृष्णा मंदे या शेतकऱ्याच्या विधवा पत्नीकडून भारतीय स्टेट बँकेने कर्ज वसुली केल्याची घटना पुढे आल्याने परिसरातील शेतकरी संतप्त झाले आहेत.
मुनगंटीवारांची गाडी अडविली
अमरावती दौऱ्यावर आलेले वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुनगंटीवार यांची गाडी अडवून कांदे फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनुचित प्रकार टळला.
>मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब फोडू
शेतकऱ्यांना दरोडेखोर ठरवून सरकार त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करीत आहे. लाठीमार करून शेतकऱ्यांचे डोके फोडत आहे. शेतकऱ्यांवर असाच अन्याय होणार असेल तर आम्ही ‘वर्षा’वर बॉम्ब फोडू, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला.
मुंबईच्या कथित सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी संयोजकांवरच तोंडसुख घेतल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांना हुसकावून लावले. त्या भाजपाच्या हस्तक असल्याचा आरोप परिषदेत करण्यात आला.
>आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे कर्ज माफ
‘मुख्यमंत्री येईपर्यंत मला जाळू नका,’ अशी चिठ्ठी लिहून वीट (ता. करमाळा) येथील धनाजी चंद्रकांत जाधव (वय ४५) या कर्जबाजारी शेतकऱ्याने बुधवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. तसेच मुख्यमंत्री फडणवीस आल्याशिवाय जाधव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली होती. शेवटी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून कर्जमाफीचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.